

Nashik Crime News : नाशिक-मुंबई महामार्गालगत असलेल्या वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 25 वर्षीय तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सारूळ शिवारातील निर्जन रानात (जंगलात) तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात भीती आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नाशिक–मुंबई महामार्गालगत असलेल्या एका निर्जन ठिकाणी आज सकाळच्या सुमारास स्थानिक नागरिकांना एक मृतदेह आढळला. याची माहिती तत्काळ वाडीवऱ्हे पोलीस ठाणे येथे देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा अंदाजे २५ वर्षे वयोगटातील एका तरुणीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आला. प्राथमिक पाहणीत या तरुणीवर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या करण्यात आल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असता, मयत तरुणीच्या मृतदेहाजवळ पिझ्झाचे बॉक्स तसेच काही खाद्यपदार्थ आढळून आले. त्यामुळे ही तरुणी कोणासोबत येथे आली होती का? किंवा तिने येथेच अन्न मागवले होते का? या शक्यतांचा पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान, तरुणीच्या अंगावर काळ्या रंगाचे कपडे असल्याची माहिती समोर आली असून, मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. ही हत्या घटनास्थळीच झाली की इतरत्र हत्या करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह येथे आणून टाकण्यात आला, याबाबतही पोलीस तपास करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईलचे लोकेशन आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपासाची पुढील दिशा ठरवण्याचे काम पोलिस करत आहेत.
याशिवाय, या वर्णनाशी मिळतीजुळती कोणतीही तरुणी बेपत्ता असल्याची माहिती असल्यास नागरिकांनी तात्काळ वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही नाशिक ग्रामीण पोलीस यांनी केले आहे. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या थरारक हत्याकांडामुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.