Eknath Khadse : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार तथा जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्यातील पूरस्थिती व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याच्या मुद्द्यावरुन फडणवीस सरकारला घेरलं आहे. फडणवीस सरकार शेतकऱ्यांचा छळ करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
सध्याचे सरकार हे असंवेदनशील सरकार आहे. नुकसानग्रस्त भागात जाऊन पाहणी करा म्हणून मुख्यमंत्र्यांना स्वत: आपल्या मंत्र्यांना सूचना द्याव्या लागतात. हे या राज्याचे दुर्दैवं आहे. यातून या सरकारची शेतकऱ्यांबाबत काय आस्था आहे हे दिसून येत असल्याचा टोला खडसेंनी लगावला.
दरम्यान सरकारकडून नुकसान भरपाई देताना विविध निकष लावून शेतकऱ्यांना छळले जात असल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केला आहे. निवडणुकीच्या काळात सरकारने लाडकी बहिण योजना राबवली. कोणतेही कागदपत्रे न तपासता थेट जीआर काढून लाडक्या बहिणींना मदत केली. थेट महिलांच्या खात्यात पैसे जमा केले होते. मग आताही त्याच पद्धतीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही पंचनामे न करता, कुठल्याही अटी व कादपत्रांच्या पडताळणीचे निकष न लावता तातडीने मदत करावी अशी मागणी खडसेंनी केली आहे.
मराठवाड्यातील अनेक भागात पूर परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे केळी, कपाशी, सोयाबीन, ज्वारी, भाजीपाला पिकांची मोठी हानी झाली आहे. बरेच नागरिक वाहून गेले आहेत. शेतकऱ्यांची जनावरे दगावली आहेत, त्यामुळे पंचानाम्याचे सोपस्कार व निकषांचे खेळ न करता ओला दुष्काळ जाहीर करा असे खडसेंनी फडणवीसांना उद्देशून सुनावलं. राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली असल्याने केंद्राने स्वतः पुढाकार घेऊन ही मदत केली पाहिजे असही एकनाथ खडसे म्हणाले.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोठे नुकसान झाल्याने कर्ज भरण्याची क्षमता शेतकऱ्यांमध्ये राहिली नाही. त्यामुळे राज्य शासनाने तातडीने कर्ज माफीची घोषणा करावी अशी मागणी एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली.
दरम्यान सोलापुरातील माढा तालुक्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यात आली. त्यावेळी कुठलेही अधिकचे निकष लावणार नाही, आवश्यकता असल्यास निकष शिथील करून शेतकऱ्यांना मदत करणार अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच दिवाळीपूर्वीच पावसामुळे नुकसान झालेल्या सगळ्यांना मदत केली जाईल असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.