Eknath Shinde : उद्धव ठाकरे यांनी कालच्या दसरा मेळाव्याच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची जोड उठवली. मणिपूर येथील पंतप्रधान मोदींच्या भाषणाचा दाखला देत उद्धव ठाकरेंनी त्यांच्या गांभीर्यावर बोट ठेवलं. तुम्हाला मणिपूर शब्दातील मणी दिसला पण तिकडच्या लोकांच्या डोळ्यात असलेले पाणी दिसले नाही हे दुर्दैव्य असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्राला केंद्र सरकारने काय दिलं असा सवाल करत पंतप्रधान मोदींच्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंनी टीका केली.
दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी आपल्या दसरा मेळाव्यातील भाषणात उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं. नरेंद्र मोदी यांची बाजु सावरत त्यांच्या समर्थनार्थ शिंदेंनी जोरदार बॅटिंग केल्याचं पाहायला मिळालं. एखाद्या भाजपच्या नेत्यानेही केलं नसेल एवढा कौतुकाचा पाऊस एकनाथ शिंदेंनी मोदींवर पाडला. राज्याला खरा आधार हा केंद्राचाच आहे हे सांगताना शिंदेंनी यादीच वाचून दाखवली.
युपीएच्या सत्तर वर्षांच्या काळात महाराष्ट्राला जेवढा निधी मिळाला नाही, त्याच्या पाच पट निधी पंतप्रधान मोदींनी 2014 ते 2024 या काळात दिल्याचं शिंदेंनी सांगितलं. केंद्राने काय दिलं म्हणून सवाल करणाऱ्यांना केवळ घ्यायची सवय आहे, द्यायची नाही असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. उद्धव ठाकरे म्हणजे केवळ 'लेना बॅंक' असल्याचं शिंदे म्हणाले.
पंतप्रधान मोदींवर तुम्हाला आरोप करण्याचा अधिकार नाही असं शिंदेंनी खडसावलं. पंतप्रधांनानी शेतकऱ्यांसाठी सन्मान निधी योजना सुरु केली. सन्मान निधी योजना व आपत्ती व्यवस्थापनामध्ये तब्बल 46 हजार कोटी रुपये दिले. देशातला उस उत्पादक जेव्हा संकटात होता तेव्हा केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटी रुपये इन्कम टॅक्सचे माफ केल्याचं शिंदे म्हणाले.
76 हजार कोटींचं वाढवन बंदर होतंय. अटल सेतूसाठी केंद्राने मदत केली. नवी मुंबई विमानतळ आणि मेट्रो 3 चे लोकार्पण मोदींच्या हस्ते होणार असल्याचं ते म्हणाले. या सगळ्या प्रकल्पांना केंद्र सरकारने निधी दिल्याचं शिंदेंनी सांगितलं. मोदी आमच्या पाठिमागे उभे आहेत, आम्हाला त्यांचा अभिमान असल्याचं शिंदे म्हणाले.
मोदींनी पाकिस्तानला धडा शिकवला. मोदींनी सत्ता हाती घेतल्यापासून सगळे घोटाळेबाज तुरुंगात गेले. मोदी बेदाग आहेत बेदाग..असे सांगतानाच बाळासाहेबांचे राम मंदिर बांधण्याचे व 370 कलम हटविण्याचे स्वप्न देखील मोदींनीच पूर्ण केल्याचे शिंदे म्हणाले. शिंदेंच्या तोंडून मोदींचे झालेले कौतुक ही शिंदे गटाची भाजपसोबतची नाळ अधिक दृढ करण्याचा व दिल्लीतील भाजप नेत्यांसोबतचे आपले नाते अधोरेखित करण्याचा प्रयत्न दिसला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.