धुळे : शिवसेनेच्या (Shivsena) आंदोलनामुळे शहरातील साक्री रोडवरील (Dhule) पथदीप लागले आहेत, असा दावा करतानाच शिवसेना ही कामांसाठी आंदोलन करते. काम झाल्यानंतर श्रेय, उद्घाटनाच्या भानगडीत पडत नाही, असा उपरोधिक टोला शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे समर्थक मनोज मोरे (Manoj More) यांनी शहराचे आमदार फारुक शाह (Faruk Shah) आणि नगरसेवक हर्षकुमार रेलन यांना लगावला आहे. (AIMIM MLA shall not the credit of street lights devolopment)
श्री. मोरे यांनी निवेदनात म्हटले आहे, की कुणाच्या आंदोलनामुळे, कुणी पाठपुरावा केल्यामुळे कामे होतात हे जनतेला ठाऊक आहे. आमच्याकडे केलेल्या कामाचे पुरावे असतात. तुमच्याकडे असतील तर ते द्या, असे आव्हान श्री. मोरे यांनी श्रेय घेणाऱ्यांना दिले.
आमदार शाह आणि नगरसेवक रेलन यांच्यात साक्री रोडवरील पथदीप लावण्यावरुन श्रेयवादाची लढाई सुरु आहे. यात एक जण पत्रक काढतो, तर दुसरा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून चिखलफेक करीत आहे. साक्री रोडवरील मोती नाल्यापासून कृष्णाई हॉटेलपर्यंत विस्तारीकरण आणि डांबरीकरणाचे काम केले गेले. काही काम प्रगतिपथावर आहे. काम होऊन एक वर्ष झाले तरी पथदीप नसल्याने या रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले होते. अपघात घडत होते. अंधाराचा फायदा घेऊन नागरिकांची लूटमार होण्याचीदेखील भीती होती. अनेक महिने हीच परिस्थिती कायम होती. त्याकडे बांधकाम विभागाचे होत असलेले दुर्लक्ष पाहता व नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता खड्डेमुक्त धुळे शहर हा संकल्प घेऊन मनपाच्या प्रवेशद्वारावर घटस्थापना करून आठ दिवसांचे यशस्वी ठिय्या आंदोलन केले.
शिवसेनेने मोर्चा बांधकाम विभागाकडे वळवला. पथदीपांचे काम झाले नाही तर मेणबत्त्या लावून निषेध आंदोलन करू, असा इशारा दिला होता. मागणीस प्रतिसाद देत तत्काळ पथदीप बसवण्यासाठी ३७ लाखांचा निधी वर्ग करण्यात आला. आक्रमक आंदोलनाच्या माध्यमातून निष्क्रीय महापालिका व बांधकाम विभागाला शहरात कामे करायला भाग पाडले. सध्या सुरू असलेली शहरातील कामे हे शिवसेनेच्या आंदोलनाचे फलित असल्याचे जनताही जाणून आहे, त्यामुळे कुणी फुकटचे श्रेय घेऊ नये, असे श्री. मोरे यांनी म्हटले आहे.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.