CM Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

फडणवीसांच्या दत्तक नाशिकसाठी शिंदे गटाची फिल्डींग!

मुख्यमंत्र्यांच्या दरबारात आज महापालिकेच्या प्रश्नावर होणार चर्चा

Sampat Devgire

नाशिक : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी नाशिक (Nashik city) शहर दत्तक घेतले होते. महापालिकेत (NMC) भाजपची (BJP) सत्ता आली. या नाशिकवर आता एकनाथ शिंदे गटाने (Eknath Shinde Group) लक्ष केंद्रीत केले आहे. महापालिकेवर ताबा मिळविण्यासाठी त्यांनी फिल्डींग लावण्यास सुरवात केली आहे. यासंदर्भात आज भारतीय जनता पक्षाला वगळून मुख्यमंत्र्यांकडे बैठक होत असल्याने तो चर्चेचा विषय आहे. (Cm Eknath shinde call a meeting for nashik municiple corporation today)

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गट सक्रिय झाला असून, महापालिकेत संदर्भातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आज मंत्रालयात तातडीची बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीमध्ये शासनाकडे प्रलंबित असलेला नोकर भरतीचा आराखडा, सिंहस्थासाठी साठ मीटरचा रिंग रोड, तसेच अमृत योजनेअंतर्गत प्रस्तावांवर चर्चा होणार आहे.

जून महिन्यात राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपपेक्षा शिंदे गटाविरुद्ध उद्धव ठाकरे गट असाच सामना पाहायला मिळेल, असे चित्र सध्यातरी दिसून येत आहे. विजयादशमीच्या मेळाव्यात शिवसेनेने मैदान मारले. तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भाषण एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा सरस ठरल्याने आता मुख्यमंत्री व शिंदे गटाला प्राप्त झालेल्या मंत्रिपदाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बाजी मारण्याची तयारी शिंदे गटाने सुरू केली आहे.

दसरा मेळावा होत नाही, तोच महत्त्वाच्या शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष देण्यास सुरवात केली आहे. नाशिकमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांच्या माध्यमातून महापालिका संदर्भातील प्रश्नांची तड लावण्यासाठी मंत्रालयात शुक्रवारी बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीत महापालिका संदर्भातील प्रश्न सोडवून यासाठी काय उपाययोजना करता येईल यावर चर्चा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

या विषयावर होणार चर्चा

नाशिक महापालिकेत संदर्भात अनेक प्रश्न असले तरी यातील काही महत्त्वाच्या प्रश्नांवरच चर्चा होणार असल्याची माहिती आहे. सिंहस्थासाठी साठ मीटर रुंदीचा रिंग रोड तयार करणे, महापालिकेचा शासनाकडे प्रलंबित असलेला आकृतिबंध मंजूर करणे, तसेच नाशिक रोड विभागातील अडीचशे कोटी रुपयांचा पाणी योजनेचा अमृत दोन योजनेत समावेश करणे या विषयांवर चर्चा होईल अशी माहिती आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत बैठक होणार आहे. मात्र, बैठकीचे विषय अद्याप निश्चित नाही. महापालिकेच्या प्रलंबित विषयासंदर्भात चर्चा होऊ शकते.

- डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त, महापालिका.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT