Eknath Shinde New : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा आज गोरेगावच्या नेस्को मैदानावर दसरा मेळावा होत आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. या मेळाव्यातून एकनाथ शिंदे काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान शिंदे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणापूर्वीच शिंदे शिवसेनेतील मंत्री प्रताप सरनाईक, गुलाबराव पाटील व आमदार किशोर दराडे यांनी एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा बोलून दाखवल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत,’ अशी इच्छा व्यक्त करत आमदार किशोर दराडे यांनी याबाबतचा निर्णय आमदारांच्या हातात असल्याचे सूचक विधान केले. तर एकनाथ शिंदे यांना संख्याबळ वाढवून मुख्यमंत्री करणार, असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. शिंदे मुख्यमंत्री व्हावेत ही प्रत्येक आमदाराची इच्छा असल्याचं विधान गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. दोन मंत्री व एका आमदाराने केलेल्या या विधानामुळे दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या चर्चांना पुन्हा हवा मिळाली आहे.
आमदार किशोर दराडे यांनी माध्यमांशी बोलताना हे विधान केलं आहे. एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत ही सर्वांचीच इच्छा आहे. पण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायचे की नाही हे शेवटी आमदारांच्या हातात आहे. शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास विकासाला शंभर टक्के गती मिळेल. सध्या विकासाला गती आहेच, मात्र शिंदे मुख्यमंत्री झाल्यास विकासाला आणखी गती मिळेल, असं आमदार दराडे यांनी म्हटलं आहे.
तर, सध्या आमचं संख्याबळ कमी असल्यामुळे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत. येणाऱ्या काळात आम्ही आमचं संख्याबळ वाढवू आणि शिंदेंना मुख्यमंत्री करू, अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
गोरेगाव येथील मेळाव्यात एकनाथ शिंदे कोणते राजकीय संकेत देतात आणि त्यांच्या भाषणातून आगामी राजकीय भूमिकेबाबत काय स्पष्ट होते, याची उत्सुकता आहे. अशातच शिवसेनेतील मंत्री व आमदारांनी केलेल्या विधानामुळे मेळाव्याआधीच राजकीय चर्चांना वेग आला आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकांना अजून बराच वेळ असतानाही शिंदे शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदावर भाष्य करण्यात येत असल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबारानंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरून प्रश्न उपस्थितीत केले जात असून सरकारवर टीका केली जात आहे. त्यावर आमदार किशोर दराडे यांनी भाष्य केलं आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचे चित्र दिसत नाही. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अत्यंत काळजीपूर्वक काम करत आहेत. एखाद्या व्यक्तीची प्रवृत्ती चुकीची असू शकते, मात्र गृह खाते व पोलिस अशा प्रवृत्तींना नक्कीच रोखेल, असं किशोर दराडे म्हणाले.
शिक्षकांच्या पगारावर परिणाम नाही...
शिक्षकांच्या पगारावर लाडकी बहीण योजनेमुळे कोणताही परिणाम होत नाही. शिक्षकांचे पगार हे अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे उशिराने होत आहेत. शिपायांकडून लिपिकाची कामे करून घेतली जात असल्याने कामांना गती मिळत नाही. शासनाच्या चुकीमुळे शिक्षकांचे पगार उशिरा होत असल्याचा दावा दराडेंनी खोडला. शिक्षकांच्या पगारासाठी तरतूद आहे. त्यांचा पगार कोणीही रोखू शकत नाही. शिक्षकांचे पगार वेळेवर होत होते आणि यापुढेही वेळेवर होतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.