Balasaheb Thorat Statement Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Balasaheb Thorat : ‘कोट्यवधींचं आमिषही फेल!’ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’समोर हा खासदार झुकला नाही, थोरातांनी सांगितली मोठी गोष्ट

Amid Maharashtra ‘Operation Tiger’, MP Rajabhau Waje refuses political pressure and stands firmly with Uddhav Thackeray, earning praise from senior leader Balasaheb Thorat : शिवेसना ठाकरे पक्षाचे खासदार फुटत असताना, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिल्याने काँग्रेसचे बाळासाहेब थोरातांकडून तोंड भरून कौतुक!

Pradeep Pendhare

Shiv Sena UBT News : देशातील आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजप-महायुतीकडून विरोधी पक्षांमधील आमदार-खासदार फोडण्याच्या राजकारणाला अभूतपूर्व वेग आला आहे. महाराष्ट्रात या फोडाफोडीच्या राजकारणाच्या सर्वात मोठ्या टार्गेटवर जर कोणता पक्ष असेल, तर तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष.

विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या चर्चित ‘ऑपरेशन टायगर’मुळे शिवसेना ठाकरे पक्षावर जबरदस्त राजकीय दबाव वाढल्याचे बोलले जात आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेतील 40 आमदार आणि अनेक खासदार फुटले. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे राजकीय अस्तित्व संपल्याच्या चर्चा रंगल्या. पण त्यानंतरही शिवसेना ठाकरे पक्षाने निवडणुकांमध्ये पुनरागमन करत 9 खासदार निवडून आणले. धक्कादायक बाब म्हणजे, या 9 पैकी तब्बल 6 खासदार पुन्हा फुटले. मात्र या सगळ्या राजकीय भूकंपात नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे हे ठामपणे उद्धव ठाकरेंसोबत उभे राहिले.

याच भूमिकेमुळे आता राजाभाऊ वाजे राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरले आहेत. सिन्नर येथे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला आणि या कार्यक्रमाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी उपस्थिती लावत थेट त्यांच्या निष्ठेचे कौतुक केले. एवढ्यावरच न थांबता थोरात यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत वाजेंचे समर्थन करत सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष संदेश दिला.

थोरात यांनी म्हटले की, “आज सत्तेचा दबाव, प्रलोभने आणि कोट्यवधी रुपयांची आमिषे दिली जात असतानाही खासदार राजाभाऊ वाजे यांनी आपल्या विचारांशी कोणतीही तडजोड केली नाही. आजच्या काळात अशी निष्ठा दुर्मिळ झाली आहे. हा सन्मान एका व्यक्तीचा नाही, तर लोकशाही आणि संविधानिक मूल्यांचा सन्मान आहे.”

राजाभाऊंचा कोट्यवधींच्या ऑफरलाही नकार

ते पुढे म्हणाले, “आज अनेक लोक फक्त सत्तेसाठी भूमिका बदलताना दिसत आहेत. सहा खासदार पक्ष सोडून गेले, पण राजाभाऊ वाजे ठाम राहिले. कोट्यवधींच्या ऑफरलाही नकार देत विचारांशी प्रामाणिक राहणारी माणसं अजून महाराष्ट्रात आहेत, हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. त्यांची भूमिका नव्या पिढीसाठी आदर्श आहे.”

फोडाफोडीचे राजकारण देशासाठी धोकादायक

देशातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर निशाणा साधताना थोरात यांनी गंभीर इशारा दिला. “आज देश कोणत्या दिशेने चालला आहे, हे प्रत्येक नागरिकाने पाहण्याची वेळ आली आहे. लोकशाही संस्था आणि भारतीय राज्यघटनेवरील विश्वास डळमळीत होऊ लागला, तर देशासाठी ते धोकादायक ठरेल,” असे त्यांनी म्हटले.

बाळासाहेब थोरातांचे युवकांना आवाहन

शेवटी त्यांनी भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानिक मूल्यांची आठवण करून देत देशातील तरुणांना थेट आवाहन केले. “जात-धर्माच्या नावावर समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न ओळखा. भारताची एकता, लोकशाही आणि संविधान वाचवायचे असेल, तर आता एकत्र येण्याची वेळ आली आहे,” असा जोरदार संदेश थोरात यांनी दिला. दरम्यान, महाराष्ट्रात सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणात राजाभाऊ वाजे यांनी घेतलेली भूमिका आता केवळ ठाकरे गटासाठीच नाही, तर संपूर्ण विरोधकांसाठी ‘निष्ठेचा आदर्श’ म्हणून पाहिली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT