Dada Bhuse & Bhausaheb Choudhary Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Shinde Politics: शिवसेना शिंदे गटाला दणका, चांदवड मतदार संघात नेत्यांचे सामूहिक राजीनामे!

Sampat Devgire

Shivsena Shinde News: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेना शिंदे गटाला मोठा झटका बसला आहे. चांदवड विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या जवळपास सर्वच पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले. या पदाधिकाऱ्यांनी संपर्क नेत्यावर गंभीर आरोप केले.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चांदवड विधानसभा मतदार संघातून शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी उमेदवारीची चाचपणी करीत होते. शिंदे गटाला हा मतदारसंघ मिळावा म्हणून प्रयत्न सुरू होते. भारतीय जनता पक्षाचे आमदार डॉ राहुल आहेर सध्या येथे विद्यमान आमदार आहेत.

भाजपचे विद्यमान आमदार डॉ. आहेर यांच्या विरोधात विरोधात महायुतीचाच घटक शिंदे गटाची ही कारस्थाने सुरू होती. मात्र शिंदे गटातील पक्षांतर्गत नेत्यांतील मानापपांनाट्य पक्षाला वेगळ्याच वाटेने घेऊन गेले.

या मतदारसंघात संपर्क नेते चौधरी आणि जिल्हा उपप्रमुख शांताराम ठाकरे या दोन्ही नेत्यांचे चांदवड विधानसभा मतदारसंघाचे नेते आणि तालुकाप्रमुख विकास भुजाडे यांच्याशी जमत नसल्याच्या बातम्या होत्या. त्याला पृष्टी देणाऱ्या राजकीय घडामोडी दिसून आल्या.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटात चांदवड मतदार संघामध्ये कोणीही कार्यकर्ता नव्हता. बहुतांशी कार्यकर्ते ठाकरे गटासोबत निष्ठेने राहिले. यावेळी मूळ भाजपशी संबंधित असलेले भुजाडे यांनी शेकडो समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश केला. या सामूहीक राजीनाम्याला हीच नव्या तालुका प्रमुखाची परस्पर नियुक्ती निमित्त ठरली.

श्री. भुजाडे यांनी मतदारसंघात शिंदे गटाची बांधणी केली. मात्र त्यानंतर आलेल्या संपर्क नेत्यांना भुजाडे यांचे हे काम पसंत पडले नव्हते. त्यामुळे या नेत्यांमध्ये सातत्याने धुसपुस सुरू होती. दोन दिवसांपूर्वी अचानक भुजाडे यांच्या पदावर नवी नियुक्ती करण्यात आल्यावर मतदारसंघातील पदाधिकारी संतापले.

या नियुक्तीमुळे कार्यकर्त्यांमध्ये संताप उसळला 52 हून अधिक पदाधिकाऱ्यांनी भुजाडे यांच्यासह पालकमंत्री दादा भुसे यांची भेट घेतली. यावेळी श्री भुसे यांनी या पदाधिकाऱ्यांना संयमाचे आवाहन करीत लवकरच वरिष्ठ नेत्यांसमवेत चर्चा करण्याचे आश्वासन दिले.

त्याआधीच या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. त्यामुळे शिंदे गटाला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे खिंडार पडले. विशेष म्हणजे पक्षाकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना नेत्यांना हा मोठा धक्का बसला आहे.

श्री. भुजाडे यांच्या समर्थनार्थ राजीनामे देण्यात आल्यानंतर धसका घेतलेल्या उपजिल्हाप्रमुख शांताराम ठाकरे, सुनील पाटील, नवनाथ निर्मल, संदीप उगले यांच्या उपस्थितीत ताताडीची बैठक घेतली. त्यात निलेश ढगे यांना नवे तालुका प्रमुख नियुक्त करण्यात आले. त्यांच्या समवेत विविध नव्या कार्यकर्त्यांनाही नियुक्त करण्यात आले.

यापूर्वीच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्त करताना वरिष्ठांची परवानगी नव्हती त्यामुळे ते अधिकृत पदाधिकारी नाहीत असा दावा करण्यात आला मात्र एकंदरच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेना शिंदे गटात धुसपुस चव्हाट्यावर आली आहे.

चांदवड विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाची या राजीनामामुळे चांगलीच फजिती झाली आहे. त्यावर तातडीने उपाययोजना करण्यात पदाधिकारी व्यस्त झाले आहेत. या संदर्भात बैठक घेऊन राजीनामा दिलेले पदाधिकारी शिंदे गटाचे नव्हतेच असा दावा करण्यात आला. त्यावर देखील तीव्र प्रतिक्रीया आल्याने या पदाधिकाऱ्यांची स्थिती आगीतून फुफाट्यात झाली.

नव्या पदाधिकाऱ्यांची देखील नियुक्ती करण्यात आली. मात्र या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये शिंदे गटाला आता निवडणुकीच्या तोंडावर राजकीय सुर कसा गवसणार याची चर्चा सुरू झाली आहे.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT