Ahilyanagar Eknath Shinde Shiv Sena internal dispute : अहिल्यानगर जिल्ह्यातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. पक्षात सामाजिक कार्यकर्त्यांपेक्षा स्वार्थासाठी आलेल्या ठेकेदारांचे प्राबल्य वाढल्याचा गंभीर आरोप करत उत्तर विभाग महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख विमल पुंडे यांनी थेट उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी पुन्हा चर्चेत आली आहे.
विमल पुंडे यांच्यासह शहर संघटिका कमल नरोडे, उपशहरप्रमुख उर्मिला लोळगे, विभागप्रमुख रुपाली महाडिक आणि प्रिती शिंदे यांनीही आपल्या पदांचे राजीनामे पाठवले आहेत. या महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेना (Shiv Sena) पक्षातील सध्याच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शिवसेनेचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांच्या शिर्डी (Shirdi) दौऱ्यात काही पदाधिकाऱ्यांनी केलेला गोंधळ हा पक्षहितासाठी नव्हे, तर व्यक्तिगत स्वार्थासाठी होता, असा आरोप विमल पुंडे यांनी केला आहे.
राजीनामा पत्रात त्यांनी म्हटले आहे की, निष्ठा, विचार आणि तत्त्वांवर उभा असलेला शिवसैनिक हीच पक्षाची खरी ताकद आहे. मात्र, काही पदाधिकाऱ्यांच्या वर्तनामुळे पक्षाची प्रतिमा सर्वसामान्यांमध्ये मलिन होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
शिर्डी दौऱ्यात घडलेली घटना ही केवळ तात्पुरती नसून भविष्यातही अशा घटना घडत राहण्याची शक्यता असल्याचे पुंडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे शिवसेनेत राहून महिला पदाधिकाऱ्यांना काम करणे अवघड होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर आपण आणि इतर महिला पदाधिकारी शिवसेनेच्या बैठका तसेच कार्यक्रमांवर बहिष्कार टाकत असल्याचे विमल पुंडे यांनी सांगितले. ‘शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आहोत,’ अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
पुंडे यांच्या मते, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर पक्षाचे काम अपेक्षित पद्धतीने होताना दिसत नाही. संघटना मजबूत करण्यासाठी पक्षाकडून आर्थिक बळ दिले जात असले, तरी त्यातून पक्षविस्ताराऐवजी गटबाजी आणि पदाधिकाऱ्यांमधील संघर्ष वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला.
राजीनामा पत्रातील सर्वाधिक चर्चेत आलेल्या आरोपात विमल पुंडे यांनी ‘पक्षात 1 टक्का सामाजिक कार्यकर्ते, तर 99 टक्के ठेकेदार आहेत’, असा दावा केला आहे. स्वार्थासाठी अनेकजण पक्षात दाखल झाल्याचा आरोप करत त्यांनी अशा वातावरणात काम करणे त्रासदायक ठरत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे स्वाभिमान जपण्यासाठी पक्षापासून दूर राहण्याचा निर्णय घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.शिर्डीतील काही पदाधिकाऱ्यांच्या वर्तनामुळे मन व्यथित झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
विमल पुंडे यांनी 1992 पासून तब्बल 34 वर्षे शिवसेनेच्या झेंड्याखाली काम केल्याचे सांगितले. सर्वसामान्य परिस्थितीतून राजकीय वाटचाल करताना त्यांनी साखर सम्राटांना आव्हान दिले आणि त्यांच्या विरोधात निवडणुकाही लढवल्याचा उल्लेख केला आहे.
महिला पदाधिकारी ते नगरसेविका असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. आजही समाजकारणाला प्राधान्य देत असल्याचे सांगताना शिर्डीतील काही पदाधिकाऱ्यांच्या वर्तनामुळे मन व्यथित झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महिला आघाडीच्या पाच पदाधिकाऱ्यांनी एकाचवेळी राजीनामे दिल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील एकनाथ शिंदे शिवसेनेतील अंतर्गत नाराजीला आता उघड स्वरूप आले आहे. या राजीनाम्यांनंतर पक्ष नेतृत्व यावर काय भूमिका घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.