

Gondia Eknath Shiv Sena News : उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या उपस्थितीत होणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्याच्या पूर्वसंध्येला गोंदियात पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
पोवार बोर्डिंग येथील कार्यक्रमस्थळी बॅनर लावणे आणि मंचावर स्थान मिळवण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि युवा सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचा आरोप आहे. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक व धारदार शस्त्राने हल्ला केल्याचे आरोप करत रामनगर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत.
डॉ. उदय सामंत (Uday Samant) यांच्या उपस्थितीत होणाऱ्या शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याच्या तयारीसाठी पोवार बोर्डिंग येथे बैठक आणि नियोजन सुरू होते. याचवेळी कार्यक्रमस्थळी कोणत्या गटाचा फलक प्रमुख ठिकाणी लावायचा आणि मंचावर कोणाला स्थान द्यायचे, यावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाल्याची माहिती आहे.
वाद वाढत गेल्यानंतर त्याचे रूप हाणामारीत झाल्याचा आरोप करण्यात आला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे (Shivsena) जिल्हाप्रमुख रुपेश कुथे यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत युवा सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी मद्यधुंद अवस्थेत आपल्यावर सशस्त्र हल्ला केल्याचा आरोप केला आहे. या घटनेत युवा सेनेचे ऋषभ मिश्रा आणि रजा भाई यांचा सहभाग असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
मात्र, दुसऱ्या बाजूने युवा सेनेचे ऋषभ मिश्रा यांनी हे आरोप फेटाळत शिवसेना पदाधिकाऱ्यांनीच आपल्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप केला आहे. मिश्रा यांनीही या प्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे सांगितले आहे.
दोन्ही गटांकडून परस्परविरोधी आरोप झाल्याने या घटनेची चौकशी कोणत्या दिशेने पुढे जाते, याकडे लक्ष लागले आहे. पोलिसांकडे दोन्ही बाजूंच्या तक्रारी दाखल झाल्याने पुढील कारवाईतून घटनेचे नेमके स्वरूप स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या गोंदिया दौऱ्याच्या आणि कार्यकर्ता मेळाव्याच्या पूर्वसंध्येलाच हा वाद उफाळून आल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत. बॅनर आणि मंचावरील स्थानाच्या वादातून झालेल्या या कथित हाणामारीनंतर पक्ष नेतृत्व या प्रकरणावर काय भूमिका घेते आणि मेळाव्यावर त्याचा काही परिणाम होतो का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.