Girish Mahajan & Eknath Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

निधी वाटपात भाजप व राष्ट्रवादीसह विरोधकांना समान वाटा

रावेर पंचायत समिती बैठकीत वादावर पडदा

Sampat Devgire

रावेर : येथील (Jalgaon) पंचायत समितीतील १५ व्या वित्त आयोगाच्या आराखडा निधी वाटपात सत्ताधारी (BJP) आणि विरोधी (NCP) अशा दोन्ही गटांनी माघार घेत आपापल्या गणासाठी विकास निधी मिळविण्याची संधी साधली. या विषयावरून एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि भाजप समर्थकांत राजकीय वाद पेटला होता. त्यावर पडदा पडला.

सत्ताधारी भाजपच्या गटाच्या चार सदस्यांना काहीसे झुकते माप देत उर्वरित सर्व ८ सदस्यांना पंधराव्या वित्त आयोगाच्या विकास आराखड्यातील निधीत जवळपास समान वाटा दिल्यानंतर या विषयावर पडदा टाकण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस तसेच माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे समर्थक व भाजपच्या सदस्यांनी यावर टोकाची भूमिका घेतल्याने यावर वाद सुरु झाला होता. हाताशी आलेला विकास निधी येत्या निवडणुकीपर्यंत पडून राहण्याची नामुष्की टळली.

शुक्रवारी पंचायत समितीच्या ऑनलाइन झालेल्या मासिक बैठकीत सर्व सदस्यांनी दिलेल्या आराखड्याला एकमताने मंजुरी देण्यात आली. गुरुवारी सायंकाळपर्यंत समान निधी घेऊ अन्यथा निधी पडून राहिला तरी चालेल, अशी भूमिका घेणारे विरोधक आणि सभापती घेतील तोच निर्णय अंतिम राहील, अशी भूमिका घेणाऱ्या सत्ताधारी गटाच्या ४ जणांनी शुक्रवारी आपली भूमिका बदलत माघार घेतली.

पंचायत समितीच्या सभापती कविता कोळी यांच्या अध्यक्षतेखाली ही ऑनलाइन बैठक झाली. बैठकीत सुरुवातीला विविध खात्यांच्या प्रश्नांबाबत माहिती घेऊन चर्चा करणे, असे विषय असले तरीही सर्वांचे लक्ष पंधराव्या वित्तआयोगाच्या ऑनलाइन आराखड्यातील निधी वाटपाच्या विषयाकडे असल्याने नेहमीपेक्षा विविध विभागाचे विषय काहीसे घाईघाईने आटोपले आणि गैरहजर अधिकाऱ्यांबद्दल कोणीही अवाक्षरही काढले नाही की नाराजीही व्यक्त केली नाही.

आजच्या या बैठकीपूर्वी काँग्रेसच्या सदस्या प्रा. डॉ. प्रतिभा बोरोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे योगेश पाटील, आणि दीपक पाटील, शिवसेनेच्या रूपाली कोळी, भारतीय जनता पक्षाच्या माधुरी नेमाडे आणि योगिता वानखेडे यांनी आपल्या आपल्या गणातील विकास कामांचे आराखडे सभापतींकडे सादर केले. या निधी वाटपात सत्ताधारी गट चार पावले आणि विरोधी गट एक पाऊल मागे गेले. ज्या चार पंचायत समिती गणात एकही रुपया तरतूद केली नव्हती तिथे प्रत्येकी ११ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. तर ज्या ४ गणात प्रत्येकी ७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती तिथेही प्रत्येकी ११ लाख रुपयांची विकास कामे निश्चित करण्यात आली आहेत. सभापती, उपसभापती, पक्षाचे गटनेते आणि माजी सभापती यांना काहीसे झुकते माप या नियोजित विकास आराखड्यात देण्यात आले आणि गेल्या पंधरा दिवसांपासून तालुक्यात गाजत असलेल्या या प्रश्नावर पडदा पडला. बैठकीत गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल, सहायक गटविकास अधिकारी डी. एच. सोनवणे, ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी डी. बी. संदानशीव उपस्थित होते.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT