EVM Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dhule Politics : संशयास्पद अवस्थेत आढळले EVM; ठाकरे गटाला वेगळाच संशय

EVM machines Found Suspicious Condition In Dhule : ईव्हिएममध्ये सेटिंग करण्यात आल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाने केल्याने खळबळ उडाली आहे...

संपत देवगिरे : सरकारनामा

Shiv Sena Thackeray Group News Dhule :

लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असतानाच धुळे येथे घडलेल्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. याबाबत शिवसेनेने (ठाकरे गट) थेट जिल्हाधिकाऱ्यांना धारेवर धरले. ईव्हीएममध्ये सेटिंग सुरू होती का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

धुळे शहरातील नगावबारी येथील शासकीय गोदामातील EVM तोडफोड झाल्याचा प्रकार काल उघडकीस आला. सुरक्षारक्षक असलेल्या या गोदामात हा प्रकार घडला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. शिवसेनेच्या (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन हा सगळा प्रकार उघडकीस आणला.

सर्व ईव्हिएम सुरक्षित असून त्यातील कोणतेही पार्ट हरवलेले नाहीत. आता हे ईव्हिएम अन्यत्र सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिली. मात्र या प्रकरणात थेट जिल्हाधिकाऱ्यांना पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण करावे लागल्याने राजकीय पक्षाच्या आणि विशेषतः महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

शिवसेनेचे (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, किरण जोंधळे, सुशील महाजन, प्रवीण साळवे, छोटू माळी, वैभव पाटील, नाना पारधी आदींसह विविध पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली.

जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला गेलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी हा प्रकार धक्कादायक असल्याची तक्रार केली. हे ईव्हीएम अपेक्षेप्रमाणे सेट न झाल्याने तोडफोड केली का? निवडणुकीच्या आधी सेटिंग करण्याचे काम सुरू होते का? लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम सेटिंग चुकीची झाली म्हणून त्या फोडल्या आहेत का? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

दोन महिने आधीच ईव्हिएम सेट करून त्यात बिघाड झाल्याने त्या तोडल्या आहेत का? अशा प्रश्नांची सरबत्तीच केली. ईव्हिएम सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी कोणाची आहे? त्यातील दोषींवर काय कारवाई करणार? या प्रकाराने लोकशाहीला मोठा धोका निर्माण झाला आहे, असे विविध प्रश्न केल्याने या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, ईव्हिएमची तोडफोड झाल्याने याबाबत तहसीलदार अरुण शेवाळे यांनी देवपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. धुळे जिल्हाधिकारी गोयल यांनी ईव्हिएम तोडफोड प्रकरणावर माहिती दिली. राज्य निवडणूक आयोगाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये वापरात येणारे हे ईव्हिएम होते. ९ जानेवारीला तपासणी दरम्यान चार बॅलेट युनिट आणि आठ कंट्रोल युनिट क्षतीग्रस्त आढळल्या होत्या. या ईव्हिएमचा वापर लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीसाठी होत नाही, असेही जिल्हाधिकारी गोयल यांनी स्पष्ट केले.

सध्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. येत्या दोन महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ईव्हिएमचा वापर करावा की नाही यावरून राजकारण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर धुळे येथे ईव्हिएम तोडफोडीचा हा प्रकार घडल्याने शिवसेना ठाकरे गटाला एक नवा मुद्दा मिळाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT