Ex MLA Rashid Shaikh  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Malegaon News: महापालिकेत आयुक्त आणि मंत्र्यांची अर्थपूर्ण युती?

माजी आमदार रशीद शेख यांचा महापालिका आयुक्तांच्या बदलीसाठी आंदोलनाचा इशारा दिला

Sampat Devgire

मालेगाव : महापालिका (Malegaon) प्रशासक तथा आयुक्त भालचंद्र गोसावी (Bhalchandra Gosavi) मनमानी पद्धतीने कामकाज करीत आहेत. अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त व सहाय्यक आयुक्तांना कुठलाही अधिकार नाही. आयुक्तांनी (Commissioner) सर्व अधिकार स्वत:कडे ठेवण्यामागे अर्थपूर्ण घडामोडी कारणीभूत आहेत. कॅम्प रुग्णालयात मंत्री (Minister) महोदयांच्या आशीर्वादाने मानधन पदावरील भरती झाली. (Rashid Shaikh made alligation on commissioner working style)

नव्याने आरोग्य विभागाच्या ६८ रिक्त जागांना मंजुरी मिळाली आहे. या जागा भरण्यासाठी एजन्सी नियुक्तीसाठी निविदा मागविल्या आहेत. एजन्सी आधीच निश्चित झाली असून, संबंधित एजन्सीच निविदा भरणार आहे. एकूणच आयुक्तांनी गैरकारभाराचा धडाका लावला आहे. त्यांच्या कामकाजाची चौकशी व्हावी, अन्यथा आगामी काळात त्यांच्या बदलीसाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आमदार रशीद शेख यांनी बुधवारी (ता. १४) येथे पत्रकार परिषदेत दिला.

श्री. शेख म्हणाले, की शहराची जबाबदारी असलेल्या महापालिकेत ही स्थिती असताना, कायदा व सुव्यवस्थाही धोक्यात आली आहे. पोलिस प्रशासनाच्या आशीर्वादाने अवैध धंदे जोमाने सुरू आहेत. जागोजागी क्लब, जुगार अड्डे झाले आहेत. गुन्हेगार सर्रास खून करीत आहेत. कुत्ता गोलीपाठोपाठ एमडी पावडरची विक्री बिनदिक्कतपणे सुरू आहे. आता तर जमीन कब्जे प्रकरणात पोलिसांचा सहभाग वाढला आहे. दरमहा कोटीची वसुली सुरू आहे. सत्तारूढ शासनाने याकडे लक्ष द्यावे. निष्क्रिय पोलिस अधिकाऱ्यांची बदली करावी. शहरील अवैध धंद्यांना आळा घालावा, अशी मागणीही त्यांनी केली. अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्यावर त्यांनी गोड बोलून वेळ मारून नेणारा अधिकारी असल्याची टीका केली.

आयुक्तांवर कठोर टीका करताना आयुक्त गुरुवारी येतात. शुक्रवारी येथील महिला जशा माहेरी जातात, तसे आयुक्त बाहेरगावी जातात. अधिकाऱ्यांनी कामकाज करताना सर्व पायऱ्या सोडल्या आहेत. आयुक्त बिले काढण्यासाठी किंवा अंदाजपत्रकीय तरतूद करण्यासाठी सर्रासपणे टक्केवारी घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. आयुक्त भ्रष्टाचारी असल्याने सामान्यांच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही. मंत्री दादा भुसे यांचा स्थानिक अधिकाऱ्यांना वरदहस्त आहे. यातूनच अधिकारी मनमानी करीत आहेत. श्री. भुसे फक्त सोयगाव व पश्‍चिम भागातील कामांवरच भर देत आहेत. रमजानपुरा, द्याने, ग्रामीण भाग त्यांच्या मतदारसंघात नाही का? सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे सर्वांत जास्त निकृष्ट दर्जाची आहेत. या सर्व तक्रारींसंदर्भात आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहाेत. आयुक्त तथा प्रशासकांच्या बदलीसाठी लवकरच मोठ जनआंदोलन करणार आहेत.

आगामी काळात महापालिका निवडणूक स्वबळावर लढू. पूर्व-पश्‍चिम भागातील सर्व जागांवर उमेदवार उभे करू. राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वबळावर सत्ता हस्तगत करेल. सत्तेसाठी आगामी काळात शिवसेनेशी कुठल्याही परिस्थितीत युती करणार नाही. बहुमत न मिळाल्यास प्रसंगी विरोधात बसणे पसंत करू. शहरातील आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल निष्क्रीय ठरले आहेत. अडीच वर्षांच्या कार्यकाळात त्यांना एकही उल्लेखनीय काम करता आले नाही म्हणण्यापेक्षा त्यांना कामच करता येत नाही, असे म्हणणे उचित ठरेल, असेही शेख म्हणाले.

माजी सभागृहनेते अस्लम अन्सारी, माजी नगरसेवक शकील बेग आदी या वेळी उपस्थित होते.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT