Lok Sabha Election 2024 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar News: मद्यनिर्मितीमध्ये राजकीय नेत्यांचे कारखाने, पण सीसीटीव्हीचा अ‍ॅक्सेस 'उत्पादन शुल्क'कडे...

Pradeep Pendhare

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे (State Excise Duty) नगर कार्यालय अवैध दारू विक्रेते, बनावट मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांविरोधात अॅक्शन मोडवर आले आहे. निवडणुकीच्या काळात हॉटेल्स, बिअरबार आणि ढाब्यांवर नियमित कारवाई होणार आहे. तसेच मद्य आणि बिअरनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांच्या उत्पादनात 30 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्यास किंवा अधिकची मद्यविक्री (Liquor sale) आढळल्यास विभागीय फौजदारी कारवाई केली जाणार असल्याची माहिती अधीक्षक प्रमोद सोनोने यांनी दिली.

दरम्यान, नगर जिल्ह्यातील 7 देशी आणि एक विदेशी मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांमधील सीसीटीव्ही (CCTV) अॅक्सेस घेत कारखान्यांमधील संशयास्पद हालचालींची नियमित तपासणी केली जात आहे. मद्यनिर्मिती करणारे कारखाने हे राजकीय नेत्यांचे आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणुकीबरोबरच यावर्षी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका (Legislative Assembly Election) होणार आहेत. त्यामुळे मद्यनिर्मिती वाढवण्यावर कारखान्यांचे लक्ष्य असणार आहे. मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांचा प्रतिमहिना आणि वार्षिक ताळेबंदीची हिशोब आम्हाला माहिती आहे. यात तफावत आढळल्यास विभागीय फौजदारी कारवाई केली जाईल. काही छुपे मार्गदेखील माहिती आहेत, ते खपवून घेणार नाही. दोषीवर शंभर टक्के कारवाई होणार म्हणजे होणारच, असा इशारा अधीक्षक प्रमोद सोनोने यांनी दिला.

नगर जिल्हा (Ahmednagar) हा मध्यवर्ती जिल्हा आहे. जिल्ह्याला सीमावर्ती भाग मोठा आहे त्यामुळे या भागात तपासणी वाढवण्यात आली आहे. नियमित 7 पथकांची गस्त सुरू आहे. परंतु जिल्ह्याच्या मोठ्या क्षेत्रफळामुळे अतिरिक्त 2 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. म्हणजेच एकूण 9 पथकांकडून अवैध मद्यविक्री रोखण्यासाठी सज्ज असून, त्यांना कारवाईचे संपूर्ण अधिकार देण्यात आले आहेत.

निवडणुकीच्या काळात सर्वाधिक अवैध मद्यविक्री ही हॉटेल्स, बिअरबार आणि ढाब्यातून होते. विशेष करून ढाब्यांवर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ढाब्यांवर कारवाई करत आहोत. यात 200 ते 300 टक्क्यांनी कारवाई वाढवल्या आहेत. नगर जिल्ह्यात 2022-23 मध्ये 540, तर 2023 ते फेब्रुवारी 24 पर्यंत 629 ढाबाचालकांवर कारवाई करण्यात आली. निवडणुकीत ही कारवाई वाढेल. मार्च 2024 महिन्याच्या सुरुवातीलाच 146 ठिकाणी कारवाई करत अवैध मद्यविक्रीसह इतर माल पकडून सुमारे 14 लाख 26 हजार 530 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नगर कार्यालयाने जिल्ह्यात एप्रिल 2023 ते मार्च 2024 पर्यंत 2 हजार 128 ठिकाणी कारवाया केल्या. यात मद्य आणि साहित्य, असा एकूण 3 कोटी 30 लाख 51 हजार 230 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे अधीक्षक प्रमोद सोनोने यांनी सांगितले.

रिक्त पदांबरोबर वाहनांची कमतरता

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Department) नगर कार्यालयाकडे 79 रिक्त पदे आहेत. एकूण 227 पदांना मंजुरी आहे. त्यातील 148 कार्यरत आहेत. यात 40 मधील कार्यकारी अधिकारी आणि जवान निवडणुकीमुळे हे सतत फिल्डवर असतात. एकूण 7 वाहने कार्यालयाकडे आहेत. परंतु लोकसभा निवडणुकीमुळे आणि पुढे येऊ घातलेल्या निवडणुकांमुळे आता आणखी वाहनांची गरज आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दोन वाहनांची मागणी असून, तसा प्रस्ताव ठेवला आहे.

बनावट मद्यनिर्मिती आणि विक्रीवर लक्ष

नगर जिल्ह्यात निवडणुकीच्या काळात बनावट मद्यनिर्मितीचा इतिहास आहे. पांगरमल (ता. नगर) मधील बनावट दारू प्रकरणामुळे निवडणूक आयोगाचे (Election Commission) नगर जिल्ह्यावर विशेष लक्ष असते. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नगर कार्यालयात सतत अलर्ट मोडवर आहे. यामुळे बनावट मद्यनिर्मितीवर विशेष लक्ष असणार आहे. त्यासाठी स्पेशल स्कॉड कार्यरत राहील. हे स्कॉड वेगवेगळ्या ठिकाणांहून मिळालेली माहिती संकलन करून छापेमारी करेल. बनावट मद्यनिर्मिती आढळल्यास फौजदारी कारवाई केली जाणार आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT