Anna Hazare Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Anna Hazare News : ...अखेर अण्णा हजारेंना मिळाला मतदानाचा अधिकार ! पारनेर सैनिक बँकेच्या निवडणुकीत मोठा टि्वस्ट

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना त्यांच्या तालुक्यात स्थापन झालेल्या सैनिक बँकेच्या मतदार यादीतून विद्यमान संचालक मंडळाकडून बाद करण्यात आलं होतं. केवळ हजारेच नाही तर इतर काही हजार सभासद मतदारांनाही मतदानापासून वंचित ठेवण्याचा जोरदार प्रयत्न झाला. मात्र, आता यावर सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडली असून सैनिक बँकेच्या अधिकृत पात्र सभासद आणि मतदार यादीमध्ये हजारे यांच्यासह इतर सभासदांचं नाव आलं आहे. आता लवकरच होणारी ही निवडणूक निश्चितच गाजण्याची शक्यता आहे.

विद्यमान संचालक मंडळानं घटनेत दुरुस्ती करत थकीत सभासद आणि शेअर(भाग मूल्य) किंमत वाढवली. यात सहभागी न झालेल्या सभासदांची पात्रता ही रद्द करण्यात आली. मात्र हे निर्णय संचालक मंडळाने सर्वसाधारण सभेत घेतले नसल्याचे म्हणणे अपात्र सभासदकांचे होते. खुद्द अण्णा हजारे यांना सुद्धा भागमूल्य वाढवल्याची माहिती नसल्याची माहिती आहे. यात विद्यमान संचालक मंडळाने विरोधी गटातील सभासदांना अंधारात ठेवल्याचं बोललं जातंय.

पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या निवडणुकी(Parner Taluka Sainik Bank Election)साठी 29 मे रोजी प्रारूप यादी प्रसिध्द झाली होती. या प्रारूप मतदार यादीत 4 हजार 148 पात्र व तर तब्बल 7 हजार हजार सभासद अपात्र मतदारांची नावे बँकेच्या शाखानिहाय प्रसिध्द करण्यात आलेल्या होत्या. या सभासद यादीवर दाखल हरकतींवरील सुनावणी होवून सोमवारी (दि.26 जून) 10 हजार 979 सभासदाची अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. यात आता अण्णा हजारे(Anna Hazare) यांचाही मतदानास पात्र सभासदांमध्ये समावेश आहे.

बँकेच्या अंतिम मतदार यादीत 10 हजार 979 मतदार असून येत्या आठ ते दहा दिवसांत सैनिक बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे अशी माहिती आहे. प्रारूप यादी जाहीर झाल्यावर अक्रियाशील नावे मतदार यादीतून वगळणे, सर्व सभासदांना अधिकार देणे व काहींच्या नावात बदल, अशा हरकती आल्या होत्या. जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी दाखल हरकतींवर सुनावणी घेत 19 जूनला सर्व सभासद पात्र असल्याचा निकाल दिला होता.

या निकालावर कोरडे, व्यवहारे आणि काही सभासद संस्थापक सभासद यांना अपात्र करण्यासाठी उच्च न्यायालयात जाऊन याचिका दाखल केली होती. परंतु, उच्च न्यायालयाने स्थगिती देण्यास स्पष्ट नकार दिल्याने त्यानूसार सोमवारी सहकार खात्याने बँकेच्या सभासदांची अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली. या आठवड्यात सहकार खाते बँकेचा निवडणूक कार्यक्रम तयार करून तो मान्यतेसाठी प्राधिकरणाकडे पाठविणार आहे. प्राधिकरणाकडून मंजूरी आल्यानंतर सहकार खाते निवडणूक(Election) कार्यक्रम जाहीर करणार आहे.

बँकेच्या निवडणुकीसाठी चेअरमन शिवाजी व्यवहारे यांचे सत्ताधारी मंडळ व विरोधी बाळासाहेब नरसाळे, विक्रमसिंह कळमकर यांचे परिवर्तन मंडळ पॅनल बनवण्यासाठी कामाला लागले आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्थापन केलेल्या व जिल्ह्यातील माजी सैनिकांची अस्मिता असणार्‍या सैनिक बँकेत सत्ताधारी मंडळींचा पाडाव करण्यासाठी पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड येथील माजी सैनिकांनी कंबर कसली आहे. सैनिक बँकेत संस्थापक 7 हजार सभासद अपात्र व्हावेत व फक्त आपले नातेवाईक सभासदच पात्र रहावेत म्हणून सत्ताधारी मंडळाने उच्च न्यायालयापर्यंत लढाई केली असं बोललं जातंय.

मात्र, अण्णा हजारे यांच्यासह सर्वांना अधिकार मिळवून देण्यासाठी बाळासाहेब नरसाळे, विनायक गोस्वामी, मारुती पोटघन, विक्रमसिहं कळमकर, बबनराव दिघे, सुदाम कोथिंबीरें, अरुण रोहकले, कॅप्टन विठ्ठल वराळ यांनी कायदेशीर लढाई लढत संस्थापक सभासदांना आधिकार मिळवून दिला व संस्थापक सभासद अपात्रतेसाठी विद्यमान संचालकांचा आटापिटा पुन्हा व्यर्थ ठरवला असल्याची चर्चा आहे. दरम्यान, अण्णा हजारे यांनी या निर्णयाचे स्वागत केले असल्याचे सांगण्यात येत आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT