Eknath Khadse  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Former MP-MLA Will Join NCP: एकनाथ खडसे देणार भाजपला दणका; माजी खासदार, माजी आमदार करणार राष्ट्रवादीत प्रवेश

Vijaykumar Dudhale

Jalgaon Political News: भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार आणि माजी आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करू इच्छितात, असे त्यांनी आम्हाला भेटून सांगितले आहे. माजी खासदारांचा मुंबईत प्रवेश होणार आहे. भाजपचे माजी आमदार मात्र आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. हे माजी खासदार आणि माजी आमदार कोण आहेत, तुम्हाला लवकरच कळेल. आम्ही आताच नावे सांगितली तर त्यांच्या मागे ईडी लागेल, असे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार एकनाथ खडसे यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज (ता. ५ सप्टेंबर) जळगाव जिल्ह्यात सभा होत आहे. तत्पूर्वी एकनाथ खडसे हे माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी भाजपचे माजी खासदार आणि माजी आमदार यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत सांगितले. ते म्हणाले की, नाशिक, बीड, कोल्हापूरपेक्षा मोठी सभा घेण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. तसे प्रयत्नही आमचे सुरू आहेत. सभेला किमान ५० हजार लोक येतील, असा आमचा अंदाज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, आमदार सुनील भुसारा, रोहिणी खडसे, मेहबूब शेख हे येणार आहेत.

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुका वगळता इतर एकाही तालुक्यातील प्रभावी नेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेलेला नाही. राष्ट्रवादीतील फुटीचा फारसा परिणाम जळगाव जिल्ह्याच्या १५ तालुक्यांत झालेला दिसत नाही. नाव घेणासारखा एकही मोठा पदाधिकारी जळगाव जिल्ह्यातून अजित पवार यांच्यासोबत गेलेला नाही, असे माजी मंत्री खडसे यांनी नमूद केले.

एकनाथ खडसे म्हणाले की, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर जळगाव जिल्ह्यातील लोकांची श्रद्धा आहे. जळगावच्या जनतनेने कायम पवार यांना साथ दिलेली आहे. मागच्या कालखंडात एस काँग्रेसचे सहा आमदार निवडून आलेले होते. अनेक सहकारी संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत, त्यामुळे पक्षाची पाळंमुळं खोलवर रुजलेली आहेत. मधल्या काळात भाजपने थोडी मुसंडी मारली होती. पण, सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस हा जळगाव जिल्ह्यात क्रमांक एकचा पक्ष होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT