Prahar Protest: विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांदवड येथे शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, असे आश्वासन दिल्याचा दावा प्रहार संघटनेने केला आहे. या कर्जमाफीचे स्मरण करून देण्यासाठी संघटनेतर्फे त्याच चांदवड शहरात महामार्गावर गुरुवारी तीन तास चक्काजाम आंदोलन केले.
माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार संघटनेतर्फे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी पदयात्रा काढण्यात आली आहे. ही पदयात्रा १२५ किलोमीटरचा प्रवास करून येत्या २ ऑक्टोबरला मंत्रालयात पोहोचेल. शेकडो शेतकरी ट्रॅक्टर आणि अन्य वाहने घेऊन महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी सरकारला धारेवर धरणार आहेत.
माजी आमदार कडू यांच्या पदयात्रेला पाठिंबा म्हणून गुरुवारी गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली चांदवड येथे शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. मुंबई आग्रा महामार्गावर हा रास्ता रोको झाला. त्यात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाल्याने जवळपास तीन तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अनेक वाहने अडकून पडल्याने आंदोलनाचा उद्देश सफल झाला.
विधानसभा निवडणुकीच्या चांदवड येथील प्रचार सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ अशी घोषणा केली होती. सत्तेवर आल्यावर मात्र मुख्यमंत्री आता कर्जमाफी बाबत टाळाटाळ करीत आहे. त्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात या संदर्भात थातुर मातूर उल्लेख करीत समिती नेमण्याचा निर्णय झाला.
महायुती सरकारने सत्तेवर येण्यासाठी अनेक घोषणा केल्या. मात्र सत्तेवर आल्यावर महत्त्वाच्या आश्वासनांचाच सरकारला विसर पडला आहे. या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी शेतकरी आणि नागरिकांनी चांदवड येथे चक्काजाम करून सरकारला समस्येच्या तीव्रतेची जाणीव करून दिली आहे, असे श्री निंबाळकर यांनी सांगितले.
राज्यातील शेतकरी ट्रॅक्टर, बैलगाडी आणि अन्य वाहने घेऊन मंत्रालयावर जाणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी हे आंदोलन होणार आहे. मात्र आम्ही महात्मा गांधींच्या शांततेच्या मार्ग नव्हे तर भगतसिंग यांच्या क्रांतीचा मार्ग अनुसरू, याची सरकारने जाणीव ठेवावी असा इशारा यावेळी देण्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.