Nashik News : हिंदुत्वाने बेरोजगारीचा अन शेतकऱ्यांचे आर्थिक प्रश्नांचा प्रश्न मिटेल का? श्री राम सर्वांचे आहे. राम मंदिर सोहळा व्हायलाच हवा पण, त्यामुळे सर्वसामन्यांची चुल पेटेल का? असा सवाल राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक गजानन शेलार यांनी उपस्थित केला.
नाशिकमध्ये सध्या भारतीय जनता पार्टीचे राजकारण मंदिराभोवती केंद्रीत झाले आहे. याबाबत गजानन शेलार यांना विचारले असता त्यांनी भाजपाच्या या राजकारणावर आगपाखड केली. भाजप व्यतिरिक्त असलेले राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी सुद्धा रामभक्त आहेत. दररोज मंदिरांमध्ये जातात. मात्र, ते भक्तीचे अवडंबर करत नाहीत. त्यामुळे भाजपच्या हिंदुत्वाने फरक पडणार नाही. आमच्या महाविकास आघाडीतील शिवसेना ( Shivsena ), राष्ट्रवादी (NCP)आणि काँग्रेससह ( Congress) समविचारी पक्षांची जोरदार तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
वातावरण वरवर निर्माण करणे आणि तळागाळात वातावरण असणे यात फरक आहे. त्यांचे वातावरण फक्त दाखवण्यापुरते आहे. त्याचा यावेळी काहीच फरक पडणार नाही. बेरोजगारीने जनता त्रस्त आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती कमकुवत झाली आहे. नाशिक (Nashik )मधील उद्योग धंदे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. दुसरीकडे शंकराचार्यांनी उपस्थित केलेल्या धार्मिक मुद्द्याकडे भाजपा दुर्लक्ष कसे करते? राम मंदिराचे (Ram Mandir)काम पूर्ण झाले नसल्याचे शंकारचार्यांनी स्पष्ट केले. तरीही राम मंदिर सोहळा पार पडणार असल्याचे आश्चर्य वाटते, असे शेलार यांनी स्पष्ट केले.
मंत्री छगन भुजबळ यांचे विरोधक असलेले शेलार त्यांच्याकडे शहराची धूरा असून, नाशिक मध्य विधानसभा मतदार संघात पक्षाची तयारी चांगली असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, पक्षाच्या फुटीनंतर बहुतांश आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात दाखल झाले आहेत. नाशिक पश्चिम, देवळाली मतदार संघासाठी ठाकरे गट पुढे आल्यास नाशिक मध्य आणि पूर्व विधान सभा मतदार संघात शरद पवार गट ताकद कशी वाढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.