Manikrao Kokate  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manikrao Kokate : गणेशोत्सवात आता राजकारणाला ‘नो एंट्री’, कोकाटेंनी आदेशच तसे दिले..

Ganeshotsav 2025 : नंदुरबार येथे झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी 'गणेशोत्सव'च्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाला काही निर्देश दिले.

Ganesh Sonawane

Manikrao Kokate : शेतकऱ्यांविषयी सातत्याने वादग्रस्त वक्तव्य व विधानसभेत रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चेत आलेले माणिकराव कोकाटे यांच्याकडे आता क्रीडा व युवक कल्याण खाते देण्यात आले आहे. याशिवाय ते नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांनी आता गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांनी राजकीय देखावे सादर करु नये असे आवाहन केले आहे.

नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या शांतता समितीच्या बैठकीत राज्याचे क्रीडा व युवक कल्याण तसेच अल्पसंख्यांक विकास मंत्री व नंदुरबारचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी आगामी गणेशोत्सव आणि ईद हे सण शांततेत व उत्साहात पार पाडावे असे आवाहन करतानाच राजकीय देखावे सादर करू नयेत असे निर्देश कोकाटेंनी दिले आहेत.

गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण सोबतच येत असून सर्व समाजबांधवांनी दोन्ही सण शांततेत साजरे करावे. शांतता समितीच्या सर्व सदस्यांना ओळखपत्रांचे वाटप केले जाईल. मंडळाच्या अध्यक्षांनी व पोलिस प्रशासनाने गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी. नागरिकांना हवे ते सहकार्य करावे हे सांगतानाच गणेश मंडळांनी सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही असेच देखावे सादर करावेत. अमली पदार्थ विरोधी तसेच समाजप्रबोधनपर देखावे सादर करण्यास प्राधान्य द्यावे. मात्र, राजकीय देखावे सादर करू नये असे निर्देश कोकाटेंनी यावेळी दिले.

या बैठकीस शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमश्या पाडवी, आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि गणेश मंडळाचे अध्यक्ष यांनी आपआपसात समन्वय ठेऊन गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत काढावी. मिरवणुकीच्या मार्गावरील विद्युत प्रवाहाची दुरुस्ती करावी. जिल्ह्यातील शहादा, नंदुरबार व गुजरातमधील काही गणेश मंडळांच्या मूर्ती विसर्जनासाठी सारंगखेडा व प्रकाशा नदीपात्रात आणल्या जातात. त्यामुळे तेथील दोन्ही पुलांच्या बाजूंची तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्ती करावी असेही निर्देश कोकाटेंनी दिले.

गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी स्वतंत्र 7 कोटी 50 लाखांची आर्थिक तरतूद केल्याची माहिती पालकमंत्री कोकाटेंनी दिली. अंडरग्राउंड वीज तारा टाकण्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना केल्या. पुढच्या काळात कार्यवाही जलद व्हावी यासाठी, गणेशोत्सवापूर्वी किमान दोन महिने आधी शांतता समितीची बैठक घेण्याची पद्धत राबवावी, अशाही सूचना केल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT