BJP Jalgaon News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्या चार महिन्यात जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महापालिकेच्या निवडणुका अपेक्षित आहेत. त्यामुळे महायुतीत या निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू आहे.
भडगाव- पाचोरा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते दिलीप वाघ यांनी भाजप प्रवेश केला. त्या पाठोपाठ पारोळा येथील माजी खासदार वसंत मोरे यांच्या दोन्ही मुलांनी देखील भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे सध्या भाजप जळगावच्या विविध मतदार संघात प्रबळ झाला आहे. विरोधकांना येथे अस्तित्वासाठी झगडावे लागण्याची चिन्हे आहेत.
राजकारणात या परिस्थितीचा लाभ प्रत्येक नेता आणि पक्ष घेत असतो. पार्श्वभूमीवर भाजपचे जळगाव जिल्ह्यातील सर्वेसर्वा मंत्री गिरीश महाजन यांनीही त्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच नगरपालिकेच्या निवडणुका स्वबळावर करण्याची तयारी असल्याचे संकेत त्यांनी दिले.
या निवडणुका भारतीय जनता पक्ष एक हाती जिंकेल. विरोधकांना अस्तित्वासाठी देखील काहीही करता येणार नाही. विशेषतः चाळीसगाव, पारोळा, जामनेर या तालुक्यात भाजप एक विचाराने निवडणुकीत उतरून शंभर टक्के जागा जिंकेल असा दावा त्यांनी केला. त्यांचे हे विधान राजकीय दृष्ट्या सहकारी पक्षांना इशारा मानला जातो.
जळगाव जिल्ह्यात अमळनेर वगळता उर्वरित सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार आहेत. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि भाजप यांच्यातच जास्तीत जास्त जागा मिळविण्यासाठी चुरस आहे. त्या दृष्टीने कार्यकर्ते आणि पदाधिकारी सक्रिय झाले आहेत.
शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे जळगावचे या पक्षाचे सर्व सूत्रे हलवतात. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे भाजपचे नेते आहेत. अशा स्थितीत तिसरा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला या निवडणुकीत सहकारी म्हणून किती स्थान आणि प्रतिष्ठा मिळेल हा चर्चेचा विषय गेले काही दिवस सुरू होता. आता मंत्री महाजन यांनी केलेल्या घोषणेने शिवसेना शिंदे गटालाही सावध व्हावे लागणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील महापालिकेसह विविध नगरपालिका आणि जिल्हा परिषदेत भाजपचा एक हाती अंमल होता. विविध सत्ता स्थाने आणि विशेषता जिल्ह्यातील दोन्ही खासदार भाजपचे असल्याने या सर्व लोकप्रतिनिधींना आपल्या मतदारसंघ सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यात भाजप सहकारी पक्षांना किती जागा सोडणार? हा गंभीर राजकीय पेच आहे. त्यातच जलसंपदा मंत्री महाजन यांची एक हाती निवडणुका जिंकण्याची घोषणा विरोधकांना इशारा की सहकारी पक्षांना चकवा अशी चर्चा आहे.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.