Ganesh Gite News: महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडला आहे. श्री गीते यांचा प्रवेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिष्ठेचा केला होता. दोन दिवसांपूर्वी हा प्रवेश अपेक्षित असताना आता तो अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडल्याचे कळते.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात असलेले पूर्वाश्रमीचे भाजपचे नेते गणेश गीते यांनी विधानसभा निवडणुकीत आमदारकीचे स्वप्न पाहिले. त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी घेतली होती. भाजपचे विद्यमान आमदार राहुल ढिकले यांच्या विरोधात उमेदवारी केल्याने त्यांच्याविषयी पक्षातच नाराजीचा सूर आहे.
महापालिकेच्या इतिहासात काँग्रेस पक्षाचे उत्तम कांबळे वगळता सलग दोन वेळा महापालिका स्थायी समिती सभापती झालेले गणेश गीते हे एकमेव आहेत. मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांनाही संधी मिळाली हे लपून राहिलेले नाही. या कालावधीतील कामकाजाबाबत त्यांच्याविषयी अनेक तक्रारी आहेत. भाजपचेच माजी सभापती उद्धव निमसे यांनी याबाबत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितली होती.
श्री गीते यांनी नाशिक पूर्व मतदार संघातून भाजपचे आमदार राहुल ढिकले यांच्या विरोधात उमेदवारी केली. विधानसभा निवडणुकीतील प्रचारात श्री गीते यांनी भाजप आणि पर्यायाने आमदार ढिकले यांच्या विविध आरोप केले. त्यामुळे पक्षात श्री गीते यांच्या विषयी मोठी नाराजी अद्यापही कायम आहे. आमदार राहूल ढिकले हे देखील त्यांच्या प्रवेशाबाबत नाखूष असल्याचे समजते.
सुधाकर बडगुजर यांचा वादग्रस्त ठरलेला प्रवेश मुंबईत झाला. त्याच दिवशी गणेश गीते हे देखील भाजपच्या प्रदेश कार्यालयात उपस्थित होते. मात्र त्यावेळी त्यांचा प्रवेश थांबविण्यात आला. २४ जूनला श्री गीते यांचा प्रवेश होईल असे जाहीर करण्यात आली होते. मात्र हा मुहूर्त देखील टाळला आहे. त्यामुळे श्री गीते यांचा प्रवेश केव्हा होणार हा चर्चेचा विषय आहे.
श्री गीते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे अतिशय घनिष्ठ संबंध आहेत. या मधुर संबंधातूनच महाजन यांनी गीते यांच्या प्रवेशाबाबत पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे आग्रह धरला आहे. यापूर्वी २०१९ मध्ये भाजपचे तत्कालीन आमदार बाळासाहेब सानप यांनी देखील उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. निवडणुकीत पराभव झाल्यावर ते पुन्हा भाजपच स्वगृही परतले होते. त्याचीच पुनरावृत्ती गणेश गीते यांच्या निमित्ताने पुन्हा एकदा होत आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपने १०० प्लस असे टार्गेट ठेवले आहे. महापालिकेत शंभराहून अधिक जागा आजवर कोणत्याही पक्षाला मिळालेल्या नाहीत. महापालिका जागांचे हे लक्ष्य साध्य करण्यासाठी पक्ष वादग्रस्त लोकांनाही प्रवेश देण्यास उत्सुक आहे. त्यामुळे पक्षात मात्र निष्ठावंत आणि माजी नगरसेवक चांगलेच नाराज झाले आहेत. या नकारात्मक स्थितीमुळेच श्री गीते यांचा प्रवेश केव्हा होणार हे अनिश्चित बनले आहे.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.