Girish Mahajan, Vidhya Gaikwad, Gulabrao Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Commissioner News: आयुक्तांविरोधाचा 'अविश्वास' मागे, पण महाजन-पाटलांचे 'टेन्शन' वाढलेलेच ! काय आहे कारण ?

कैलास शिंदे

Jalgaon News: जळगाव महापालिका आयुक्तांविरोधात भाजपने आणलेल्या अविश्वास ठारवाची कोंडी फोडण्यासाठी अखेर मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटलांची जोडी धावून आली. या दोघांनी नगरसेवक आणि आयुक्तांत समेट घडवून अविश्वासाचा ठराव मागे घेतला. त्यामुळे आयुक्तांवरबाबतचा रोष काहीसा मावळ असला तरी त्यावरून भाजपच्या नगरसेवाकांमध्ये गटबाजी पुढे आली आहे. त्यामुळे महाजन-पाटलांच्या हस्तक्षेपानंतर पालिकेतील हा वाद शमला असला तरी त्यावरून पुढच्या काळात राजकीय वादळ उठण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. (Latest Political News)

महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड विकासकामाकडे दुर्लक्ष करतात असा आरोप करीत भाजपच्या नगरसेवकांनी त्यांच्यावर अविश्‍वास आणला होता. त्याला सहकारी पक्ष शिंदे गटासह सत्ताधारी ठाकरे गट आणि 'एमआयएम'च्याही नगरसेवकांनी पाठिंबा दिला. अविश्‍वास प्रस्ताव दाखल झाल्यावर सभेत मतदान करण्याबाबत मात्र भाजपसह, सत्ताधारी शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट आणि 'एमआयएम' पक्षाच्या नगरसेवकांनी माघार घेतली.

अविश्‍वास प्रस्ताव आणल्यामुळे भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळे मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही या प्रकरणी लक्ष घातले. अविश्‍वास प्रस्ताव नामंजूर झाल्यास पक्षाला मोठा फटका बसणार होता, त्यामुळे राज्यात सत्तेत असलेले सहकारी पक्ष शिवसेना शिंदे गटासही झटका बसला असता. त्यामुळे आयुक्त व नगरसेवकात मध्यस्थी करणे हाच योग्य पर्याय असल्याचे चाणाक्ष नेत्यांनी हेरले. त्यांनी नगरसेवक व आयुक्तांची बैठक घेवून समझोता घडवून आणला. त्यामुळे आयुक्तावरील अविश्‍वास ठराव तहकूब करण्यात आला.

बंद दाराआड मंत्र्यांनी समझोता घडवून प्रश्‍न सोडविला असला तरी आता भाजपसह सर्वच पक्षातील नगरसेवकांत आपसातील बेबनाव समोर आला आहे. भाजपमध्ये तर तीन गट असल्याचे समोर आले. शिवसेना ठाकरे गटातही काही अलबेल आहे, असे नाही. शिवसेना शिंदे गटातही फुटाफुटीची स्थिती दिसून आली.

बहुतांश नगरसेवकांचे अविश्‍वास आणण्यास विरोध होता तर काही नगरसेवकांनी सहमती दर्शविली होती. इतर पक्षातील गटबाजीपेक्षा भाजपमधील गटबाजीचा पक्षाला फटका बसला आहे. जळगाव भाजपचा बालेकिल्ला असून जिल्ह्यात दोन खासदार आणि शहराचे आमदारही पक्षाचेच आहेत.

शहरातील पक्षाच्या बांधणीच्या बळावर निवडणुकांत यश मिळत होते. परंतु आता नगरसेवकांतील आपसातील गटबाजीमुळे भाजपला आगामी निवडणुकीत हे साधणे कठीण जाणार असल्याचे बोलले जात आहे.

मंत्री गिरीश महाजन यांनी आयुक्त गायकवाड आणि नगरसेवकांशी चर्चा केली त्यावेळी आयुक्तांनीही आपली बाजू कशी व्यवस्थित आहे, हे ठासून सांगितले. तसेच महाजन आणि पालकमंत्र्यांच्या आदेशानुसारच काम केल्याचे त्यांनी पटवून दिले. दरम्यान, चर्चेतून अविश्‍वास ठरावाची सभा तहकूब झाला असला तरी हे पेल्यातील राजकीय वादळ शांत झाले आहे. गटबाजीमुळे आगामी काळात भाजपपुढे काय वाढून ठेवले, याचीच आता जास्त चर्चा सुरू आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT