Nashik Kumbh Mela Meeting : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा प्राधिकरण कार्यालयात शनिवारी (दि. १९) ध्वजारोहण सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढाव घेण्यासाठी बैठक झाली. या बैठकीत कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर परिसरातील बेझे येथील बेटावर त्र्यंबकराजाची पंचधातूची पंचमुखी ३१ फूट उंच मूर्ती उभारण्यात येणार आहे. या बैठकीत प्रस्तावित मूर्तीच लहान प्रतिकृती ठेवण्यात आली होती. परंतु या प्रतिकृतीला महादेवाचा गंध (त्रिपूंड) का लावण्यात आला नाही असा आक्षेप घेत जुना आखाड्याचे प्रमुख महंत हरिगिरी महाराज यांनी बैठकीतच प्रशासनाला धारेवर धरलं. त्यामुळे बैठकीत काही संताप झालेल्या हरिगिरी महाराज यांनी कुंभमेळामंत्री मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच बैठकीतून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे काही काळ वातावरण तापलं.
३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहण सोहळा होणार असल्याने या ध्वजारोहण 'सोहळ्याच्या तयारीसाठी प्राधिकरणाच्या कार्यालयात गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत लोकप्रतिनिधी, साधूमंहतासह तसेच अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत मुख्यवट्यावर हरिगिरी महाराज यांनी आक्षेप घेत, अधिकारी व महाजन यांनाच खडे बोल सुनावले.
विकासकामांच्या बाबतीत त्र्यंबकेश्वर बाबत दुजाभाव केला जात असून साधू महंताना न विचारताच प्रशासन काम करत असल्याचा आरोप करत, हरिगिरी महाराज यांनी बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केला. मंत्री महाजन यांनी मध्यस्थी करुन त्यांची समजूत काढल्यानंतर वादावर पडदा पडला.
यासंदर्भात गिरीश महाजनांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, त्र्यंबक राजाच्या प्रतिकृतीवर त्यांचा आक्षेप नव्हता. पंरतु साधू महतांना त्याविषयी कल्पना द्यायला हवी होती. नकाशावर दाखवायला हवे होते, असा त्यांचा आक्षेप होता. साधू-महतांच्या सूचनांचा योग्य तो सन्मान केला जाईल असं महाजनांनी स्पष्ट केलं.
दुजाभाव होत असल्याचा आक्षेप
त्र्यंबकेश्ववर अन्याय होत असून सिंहस्थाच्या नाशिकच्या कामांना झुकते माप दिला जात असल्याचा आरोप त्र्यंबकच्या साधूमहंतानी यांनी केला. त्र्यंबकेश्वरमध्ये देखील कुंभमेळा आहे. असे असताना नाशिकला अधिक निधी दिला जात आहे. तसेच सर्व बैठका तिथेच घेतल्या जात असल्याने आणि प्रशासनाकडून विश्वासात घेतले जात नसल्यामुळे साधू महंतानी या बैठकीत नाराजी व्यक्त केली आहे.
परंतु, मंत्री महाजन यांनी मात्र नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये कुठेही दुजाभाव केला जात नसल्याचे स्पष्ट केले. कुंभमेळ्याच्या नियोजनात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर असा कोणताही भेदभाव केला जात नाही. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील साधू-महंतांमध्ये अनेक वर्षांपासून असलेले मतभेद दूर करून सर्वांना एकत्र घेऊन सिंहस्थाचे नियोजन करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.