Nashik Politics : नाशिकमध्ये भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी शंभर प्लसचा नारा दिला होता. त्यानुसार सुरुवातीपासून भाजपने स्वबळाची तयारी सुरु केली होती. मित्र पक्षांना भाजपने प्रतिसाद न दिल्याने राष्ट्रवादी-शिवसेना यांनी युतीची घोषणा करुन टाकली. त्यामुळे भाजपचा स्वबळाचा मार्ग मोकळा झाला. अशीच काहीशी खेळी महाजन यांनी मालेगाव महापालिका निवडणुकीत खेळली आहे.
येथील महापालिका निवडणुकीसाठी भाजप व शिवसेना शिंदे गट यांच्यात युतीची चर्चा सुरु होती. पण भाजपचे नेते अद्वय हिरे, बंडूकाका बच्छाव व सुनील गायकवाड यांनी शिवसेनेसोबत युती करायला उघडपणे विरोध दर्शविला. या तीन्ही दिग्गज नेत्यांची मागणी मान्य करत मंत्री गिरीश महाजन यांनी मालेगाव मनपासाठी स्वबळाची घोषणा केली आहे. रात्री उशीरा बैठक घेत त्यांनी भाजपचे उमेदवारही फिक्स केल्याची माहिती आहे.
मालेगाव महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने गिरीश महाजन यांनी फार आधीच जाळं टाकून ठेवलं होतं. शिवसेनेचे दादा भुसे यांचे कट्टर विरोधक असलेले व विधानसभेला भुसेंच्या विरोधात निवडणूक लढवलेले अद्वय हिरे व बंडूकाका बच्छाव या दोघांचेही भुसेंची कोंडी करण्यासाठी महाजन यांनी भाजपमध्ये प्रवेश घडवून आणले. मालेगाव महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊनच या दोघांनाही भाजपमध्ये प्रवेश देण्यात आले.
तसेच वर्षभरापासून भाजपपासून काहीसे दूर गेलेले सुनिल गायकवाड हेही आता पक्षात सक्रीय झाले आहेत. २०१७ च्या निवडणुकीत गायकवाड यांच्या नेतृत्वात ९ जागा निवडून आल्या होत्या. त्यामुळे गायकवाड यांचा प्रभाव पाहाता त्यांना सोबत घेणं भाजपसाठीही फायद्याचं आहे. त्यामुळे भाजपनेही झालं गेलं विसरुन त्यांच्याही गळ्यात भाजपचा गमछा घातला आहे. वरील तीन्ही दिग्गज नेत्यांना हाताशी धरुन गिरीश महाजन यांनी मालेगाव मनपाच्या निवडणुकीसाठी रणनिती आखली आहे.
महापालिका निवडणुकीत कॅम्प संगमेश्वरच्या पाच प्रभागांतील २० जागांसाठी भाजप-सेना युतीची चर्चा सुरू होती. शिवसेना १२ आणि भाजप ८ जागा, अशी चर्चा पुढे आली. पण मागच्या निवडणुकीत जिंकलेल्या जागांपेक्षा कमी जागा स्वीकारून युती करणे म्हणजे पक्ष संपविण्याचा डाव असल्याचा आरोप वरील तीन्ही दिग्गज नेत्यांनी केला. तसेच युतीसाठी आग्रह धरणारे भाजपमधील पदाधिकारी हे शिवसेनेची 'बी टीम' म्हणून काम करीत असल्याची जोरदार टीकाही त्यांनी केली. हा विरोध पाहाता भाजप व शिवसेना युती आता फिस्कटली असून भाजप स्वबळावर लढणार आहे.
मंत्री महाजन यांना सुरुवातीपासून मालेगावात शिवसेनेसोबत युती करायची नव्हती. त्यांनीच अद्वय हिरे, बंडूकाका बच्छाव व सुनिल गायकवाड यांना हाताशी धरुन नाशिकप्रमाणे मालेगावतही स्वबळावर निवडणूक लढवण्याची खेळी खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.