Heavy Rain Maharashtra मुंबईसह राज्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत विविध प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली. नैसर्गिक आपत्ती, मृत्यू, मुंबई-पुणे संपर्क, मिसिंग लिंक, भ्रष्टाचाराचे आरोप आणि मुंबईतील पूरस्थिती यावर त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.
प्रश्न : मुंबईतील दुर्घटनांमुळे आपत्ती व्यवस्थापन अपयशी ठरले का?
गिरीश महाजन : आपत्ती व्यवस्थापन कुठेही कमी पडलेले नाही. मुंबई महापालिका, अग्निशमन दल, SDRF, NDRF, पोलीस आणि सर्व संबंधित यंत्रणा २४ तास काम करत आहेत. मॅनहोल दुर्घटनेच्या ठिकाणी झाकण उघडे असले तरी तेथे कर्मचारी तैनात होता. मात्र संबंधित व्यक्ती फोनवर बोलत चालत असल्याने थेट मॅनहोलमध्ये पडली. झाडे पडण्याच्या घटनाही वादळी वाऱ्यांमुळे वाढल्या आहेत. वर्षभरात जेवढी झाडे पडतात, त्यापैकी मोठ्या प्रमाणात झाडे अवघ्या दोन-तीन दिवसांत पडली. त्यामुळे ही परिस्थिती प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नव्हे, तर अभूतपूर्व हवामानामुळे निर्माण झाली आहे.
प्रश्न : मान्सूनपूर्व तयारी करण्यात सरकार कमी पडले का?
गिरीश महाजन : मान्सूनपूर्व सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यात आली होती. मात्र जुलै महिनाभरात पडणारा पाऊस अवघ्या दोन-तीन दिवसांत झाला. त्यात ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. अशा परिस्थितीत झाडे पडणे, पाणी साचणे किंवा काही ठिकाणी दुर्घटना होणे टाळणे कोणत्याही यंत्रणेला शक्य नाही. ही नैसर्गिक आपत्ती आहे आणि तिचा सामना करण्यासाठी संपूर्ण प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे.
प्रश्न : सरकार नैसर्गिक आपत्तीच्या नावाखाली जबाबदारी झटकत आहे का?
गिरीश महाजन : सरकार कोणतीही जबाबदारी झटकत नाही. मुख्यमंत्री स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. सर्व अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन विभाग, महापालिका, SDRF आणि NDRF सतत काम करत आहेत. या परिस्थितीत दोषारोप करण्यापेक्षा राज्यावरील संकट म्हणून पाहण्याची गरज आहे. भविष्यात अशा घटनांवर अधिक प्रभावी उपाययोजना करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्लाही घेतला जाणार आहे.
प्रश्न : आपत्ती व्यवस्थापनासाठी हजारो कोटींचा निधी मिळतो. मग नियोजन कुठे कमी पडले?
गिरीश महाजन : निधीचा योग्य वापर होत आहे. दरवर्षी पूरप्रवण भागांमध्ये आवश्यक कामे केली जातात. मात्र विक्रमी पाऊस, ढगफुटीसदृश परिस्थिती आणि सलग अतिवृष्टी यापुढे कोणतेही नियोजन पूर्णपणे प्रभावी ठरू शकत नाही. त्यामुळे केवळ निधीवर प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही.
प्रश्न : मुंबई-पुणे मार्ग बंद होणे ही सरकारसाठी लाजिरवाणी बाब नाही का?
गिरीश महाजन : इतका पाऊस यापूर्वी क्वचितच झाला आहे. नद्या दुथडी भरून वाहू लागल्या, धरणे भरली आणि पाणी थेट महामार्गावर आले. त्यामुळे काही काळ वाहतूक बंद ठेवावी लागली. प्रशासनाने तातडीने यंत्रणा राबवून मार्ग सुरू करण्याचे काम केले. अशा अभूतपूर्व परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेलाच प्राधान्य देण्यात आले.
प्रश्न : मिसिंग लिंक बोगद्याजवळ दरड कोसळल्याने गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले का?
गिरीश महाजन : हा प्रश्न चुकीच्या पद्धतीने मांडला जात आहे. दरड बोगद्यावर कोसळलेली नाही, तर बोगद्याच्या बाहेरील डोंगरावरून माती आणि दगड घसरले. अतिवृष्टीमुळे भूस्खलन झाले. त्याचा बोगद्याच्या गुणवत्तेशी किंवा बांधकामाशी कोणताही संबंध नाही.
प्रश्न : दोन दिवसांत १२ जणांचा मृत्यू झाला. सामान्य नागरिकांच्या जीवाची किंमत नाही का?
गिरीश महाजन : प्रत्येक मृत्यू अत्यंत वेदनादायी आहे. मी स्वतः मानखुर्दला जाऊन परिस्थितीची पाहणी केली. संबंधित इमारत आधीच धोकादायक घोषित करून रिकामी करण्यात आली होती. मात्र शेजारील पत्र्याच्या घरात सहा जण राहत होते. इमारत कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. अनेक वेळा नोटिसा देऊनही नागरिक घरे रिकामी करण्यास तयार होत नाहीत, हीदेखील मोठी समस्या आहे.
प्रश्न : आपत्ती व्यवस्थापनात भ्रष्टाचार आणि पैशांच्या मागणीचे आरोप होत आहेत.
गिरीश महाजन : हे आरोप पूर्णपणे निराधार आहेत. कोणीही पुराव्यासह पुढे यावे. जर कोणाकडे ठोस पुरावा असेल तर मी स्वतः कारवाई करेन. मागील वर्षीचा मोठा निधी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरण्यात आला होता. यावर्षीच्या निधीतील एक रुपयाही अद्याप खर्च झालेला नाही.
प्रश्न : दरवर्षी मुंबईची तीच परिस्थिती का होते?
गिरीश महाजन : मुंबईची भौगोलिक रचना वेगळी आहे. चारही बाजूंनी समुद्र असल्यामुळे भरतीच्या वेळी पावसाचे पाणी बाहेर जाऊ शकत नाही. त्यामुळे काही काळ पाणी साचते. पंपिंग स्टेशन, ड्रेनेज सुधारणा आणि इतर अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र दोन दिवसांत महिनाभराचा पाऊस पडल्यास कोणतेही शहर पूर्णपणे जलमुक्त ठेवणे शक्य नाही.
प्रश्न : विरोधकांना काय संदेश द्याल?
गिरीश महाजन : ही राजकारण करण्याची वेळ नाही. हे संपूर्ण राज्यावर आलेले संकट आहे. अशा वेळी सर्व पक्षांनी एकत्र येऊन प्रशासनाला सहकार्य करावे आणि नागरिकांचे जीव वाचवणे हेच सर्वोच्च प्राधान्य ठेवावे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.