Girish Mahajan mission in Nashik election Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan : नाशिकच्या खड्ड्यांवरुन भुजबळांची फायरिंग; गिरीश महाजन म्हणतात भुजबळ साहेब म्हणतात ते बरोबर, यंत्रणेला 8 दिवसांचा अल्टिमेटम

Girish Mahajan, Nashik potholes : नाशिकमधील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांच्या व मृत्यूच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने नाशिककडे धाव घेतली. बैठक घेत त्यांनी खड्डे बुजवण्याचे निर्देश दिले.

Ganesh Sonawane

Nashik Politics : नाशिकमधील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी नाशिक तातडीने गाठलं. खड्ड्यांमुळे तब्बल पाच जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष वाढला आहे. मंत्री महाजन यांच्यासह पालिका प्रशासनावर टीका होत आहे.

मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या खड्ड्यांवर आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये लक्ष द्यावं, त्यांची जबाबदारी आहे असं आवाहन भुजबळांनी केलं. कुंभमेळा आमच्या मुळावर यायला नको. नाशिकचे असे हाल यापूर्वी कधीही झाले नाही असा संताप भुजबळांनी व्यक्त केला.

त्यावर बोलताना महाजन म्हणाले, भुजबळ साहेब म्हणतात ते बरोबर आहे. कुंभमेळा मंत्री म्हणून संपूर्ण जबाबदारी माझी आहे. कुंभमेळ्यासाठी सुरू असलेली कामे निश्चित वेळेत पूर्ण होतील आणि पुढील सहा महिन्यांत नाशिकचा चेहरामोहरा बदलेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र, थोडाकाळ त्रास सहन करावा लागेल असं महाजन म्हणाले.

नाशिकची याआधी अशी परिस्थिती कधी झाली नाही, हे भुजबळ साहेब म्हणताय हे खरे आहे. पण, इतक्या मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये पहिल्यांदाच कामे होत आहेत. आपण दर्जेदार कामे करणार आहोत. एक नवीन व मॉर्डन नाशिक आपण करत आहोत असं महाजन म्हणाले.

कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी महानगरपालिका कार्यालयातील सभागृहात अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन कडक निर्देश दिले. खड्ड्यांमुळे नागरिकांचे जीव जात असताना कोणाचीही गय केली जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. तसेच आठवडाभरात शहरातील सर्व खड्डे बुजविण्याचे आदेश त्यांनी दिले.

खोदकामानंतर तातडीने दुरुस्ती करणे आणि कामाच्या ठिकाणी योग्य सुरक्षा व्यवस्था करणे, पर्यायी रस्ते सुरक्षित ठेवणे ही ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. दोन ते तीन दिवसांत तातडीचे खड्डे बुजवावेत, अंबडसह सर्व प्रमुख रस्ते दुरुस्त करावेत आणि निधीची चिंता न करता त्वरित काम सुरू करावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई सुरू असल्याचे सांगत, आतापर्यंत सुमारे सहा कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. काही ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्यात आले असून यापुढेही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नाशिकमधील अपघातात मृत्यू झालेल्या निलेश कोतकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर महाजन यांनी त्यांच्या मुलीच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याची तसेच त्यांच्या पत्नीला नोकरी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची घोषणा केली.

कोतकर कुटुंबीयांची सांत्वनपर भेट, शासनाकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

मंत्री गिरीश महाजन यांनी आज अंबड परिसरातील दुर्दैवी अपघातात मृत्यू झालेल्या दिवंगत निलेश प्रल्हाद कोतकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त करत शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

यावेळी महापौर हिमगौरी आडके आमदार सिमा हिरे, स्थायी समितीचे सदस्य मच्छिंद्र सानप नगररसेवक सुधाकर बडगुजर, नगरसेवक सुवर्णा मटाले व अधिकारी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT