Anita Bhamre & Girish Mahajan
Anita Bhamre & Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

गिरीश महाजनांनी महाविकास आघाडी बाबत शाब्दीक खेळ बंद करावेत!

Sampat Devgire

नाशिक : राज्यातील आघाडी सरकार म्हणजे चोर पोलिसाचा खेळ नसून विरोधी पक्षाची चाल गारूडी खेळासारखी आहे, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नाशिक शहराध्यक्ष अनिता भामरे (Anita Bhamre) यांनी भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना दिले आहे.

त्या म्हणाल्या, 'खोटे बोला पण रेटून बोला' या उक्तीनूसार भाजप आमदार महाजन भाजप मेळाव्यात बोलत आहेत. वास्तविक पाहता प्रकृती अस्वाथामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना काही दिवस राज्यकारभार घरून पाहवा लागत आहे. परंतू विद्यमान मुख्यमंत्रीपदी असलेल्या व्यक्तिच्या आजारपणाचे भांडवल करून बदनामी कशी करावी हे भाजपच्या लोकप्रतिनिधींना चांगले जमते.

माजी वनमंत्री संजय राठोड यांना पूजा चव्हाण प्रकरणात नाहक राजीनामा द्यायला भाग पाडले. यात विशेष म्हणजे पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी तर संजय राठोड यांच्या विरोधात कुठलीही तक्रार पोलिसांकडे केली नव्हती. तोच प्रकार माजी गृहमंत्री अनिल देशमुखांसोबत घडलेला पहावयास मिळतो. मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकडे कुठलाही पुरावा नसतांना १०० कोटी रूपयांच्या वसुली प्रकरणी आरोप केल्याने देशमुखांना जेलमध्ये जावे लागले. बेशिस्त वागणूक व न्यायालयाच्या अवमान प्रकरणी परमबीर सिंह यांना राज्य सरकारने निलंबित केले, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणावी लागेल.

यासंदर्भात अंतिम चौकशीत सत्य बाहेर येईपर्यंत विरोधी पक्ष भाजपाने महाविकास आघाडी सरकारची बदनामी गारूडीच्या खेळासारखी चालवली आहे. गारूडी गावभर फिरत ढोल पिटून मुलाबाळांना जमवतो. नंतर हळूहळू मोठी माणसे आले की, ढोल वाजवणे थांबवून आपल्या जादूच्या करामतीने हातरूमाल, रिबिन, पैशांचे नाणे गायब करतो आणि भीतीयुक्त, विस्मयकारक पध्दतीने खेळ करून जमलेल्या लोकांकडून पैसे उकळतो. तोच प्रकार सध्या विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधी करत आहेत.

राज्य सरकार मधील मंत्र्यांवर खोटेनाटे आरोप करायचे, बदनामी करायची, शेतकऱ्यांविषयी नसलेली सहानुभूती दाखवायची आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करायचे. भाजपच्या लोकप्रतिनिधींना आता आमची विनंती आहे की, गोर गरीब जनतेला वेडे समजू नका. जनता आता दुधखूळी राहिली नाही. चांगले वाईट त्यांना समजते त्यामुळे गारूडीचे खेळ खेळणे बंद करा.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT