Girish Mahajan News: महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी इनकमिंग साठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. त्याचा सहकारी पक्षांनीही चांगलाच धसका घेतला आहे.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक महापालिका निवडणुकीसाठी पक्षातील परंपरागत नेत्यांना साईड ट्रॅक करण्याचे धोरण स्वीकारल्याचे सध्याचे चित्र आहे. आपल्या खास यंत्रणेमार्फत माजी नगरसेवकांना मधाचे बोट लावून भाजप प्रवेश घडविण्याचे त्यांचे नियोजन आहे. पुढील आठवड्यात भाजप आणखी काही प्रवेश करणार असल्याचे मंत्री महाजन यांनी विधान केले होते.
पुढील आठवड्यात भाजप काही माजी नगरसेवकांना प्रवेश देणार असल्याचे बोलले जाते. यामध्ये नाशिक रोड भागातील शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या दोन माजी नगरसेवकांचाही समावेश आहे. हे नगरसेवक यापूर्वी शिवसेना ठाकरे पक्षातून शिंदे पक्षात गेले होते. मात्र त्यांना आता निवडणुकीसाठी भाजपा अधिक सोयीचा वाटू लागला आहे.
नाशिक महापालिकेसाठी स्वबळावर सत्तेत येणार, असे भाजप नेते वारंवार सांगत आहेत. त्यात 'हंड्रेड प्लस' हे उद्दिष्ट त्यांनी निश्चित केले आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे बहुतांशी नेते निवडणुकीत युती होईल या अपेक्षेने शांत आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या विस्ताराला मात्र भाजपच्या सध्याच्या धोरणाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीत पक्ष सोडतील असे फारसे प्रभावी नेते नाहीत. निष्ठावंतांवर केलेले प्रयोग फारसे यशस्वी होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे सहकारी पक्षातील शिवसेना एकनाथ शिंदे पक्षालाच टार्गेट करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे पक्षाचे पदाधिकारी ही सावध झाले आहेत.
भाजप महापालिका निवडणुकीसाठी जोरदार फिल्डिंग लावण्यात व्यस्त आहे. त्यासाठी एका प्रभागात अनेक इच्छुक तयार होऊ लागले आहेत. त्याचा धसका भाजपच्या विद्यमान माजी नगरसेवकांनी घेतला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी मंत्री महाजन यांनी केलेल्या व्युहरचनेचा भाजपच्या प्रस्थापितांबरोबरच सहकारी पक्षांनीही धसका घेतला आहे.
शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने अतिशय आक्रमकपणे आपल्या विस्तार केला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक माजी नगरसेवकांनी शिंदे पक्षात प्रवेश केला. त्याचा विचार करता शिंदे पक्ष स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करेल, असे संकेत होते. त्याला स्थानिक नेत्यांनीही आता दुजोरा दिला आहे. त्यामुळे निवडणुका जवळ येतील तसे महायुतीतील घटक पक्षांमध्येच जागावाटप आणि फोडाफोडी साठी चुरस वाढण्याची चिन्हे आहेत.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.