Gikul Zirwal, Narhari Zirwal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Narhari Zirwal Politics: दिंडोरीत पुन्हा ट्विस्ट, गोकुळ झिरवाळ मागू शकतात विधानसभेची उमेदवारी

Sampat Devgire

NCP Sharad Pawar News : विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहेत. मात्र झिरवाळ यांच्या चिरंजीवांनी आज वेगळीच भूमिका घेतली. त्यामुळे दिंडोरीच्या राजकारणात ट्विस्ट निर्माण झाला आहे.

राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या प्रमाणावर गोंधळाची स्थिती आहे. कुटुंबातील एक सदस्य एका पक्षात आणि दुसरा वेगळ्या पक्षात अशी स्थिती आहे. माझी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुलाने नुकतीच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली होती. त्यांनी उमेदवारीचीही मागणी केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जवळचे नेते नरहरी झिरवाळ यांच्याबाबतीत घडली आहे. नरहरी झिरवाळ यांचे चिरंजीव गोकुळ यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस निष्ठावंतांच्या मेळाव्याला हजेरी लावली. त्यांची ही उपस्थिती अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरली. याबाबत विविध माध्यमांनीही त्याची दखल घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांना धक्का बसला.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मेळावा आज येथे झाला. या मेळाव्याला अनेक इच्छुक तसेच पदाधिकार्‍यांनी हजेरी लावली. प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याकडे उमेदवारीसाठी अर्ज ही देण्यात आले. विशेष म्हणजे या मेळाव्याला विधानसभेचे उपाध्यक्ष हिरवा यांच्या मुलाने हजेरी लावली होती.

गोकुळ झिरवाळ यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या पदाधिकार्‍यांकडे शिष्टमंडळ पाठवले होते. त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाकडे उमेदवारीची मागणी केली होती. त्याचवेळी दिंडोरीच्या राजकारणात वेगळे काहीतरी घडणार याची चाहूल लागली होती.

लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवाळ हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराच्या व्यासपीठावर दिसले होते. त्यावरून बऱ्याच वाद झाला होता. त्यांचा मुलगा गोकुळ मात्र महाविकास आघाडीकडे राहिला.

महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांचा प्रचार केल्याचा दावा त्यांनी केला. गोकुळ झिरवाळ आगामी विधानसभा निवडणुकीसाठी देखील इच्छुक म्हणून चर्चेत आहेत. त्यामुळे दिंडोरी तालुक्याच्या राजकारणात पुन्हा एकदा अजित पवार गटाला दुसरा धक्का देण्याची तयारी सुरू असल्याचे बोलले जाते.

या राजकीय घडामोडीमुळे दिंडोरी मतदारसंघातील राजकारणात एक नवा ट्विस्ट आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे त्यात अजित पवार गटाला धक्का देण्याचे मनसुबे आखले जात आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच दिंडोरीच्या राजकारणात गोकुळ झिरवाळ यांनी दुसरा धक्का दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT