Gopichand Padalkar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Gopichand Padalkar : शरद पवार समर्थक आदिवासींना धनगर समाजाविरोधात फितवताहेत : पडळकर

कैलास शिंदे

Jalgaon News : धनगर समाज आदिवासींचे आरक्षण बळकावत आहेत, असे सांगून धनगरांच्या विरोधात फितविण्याचे काम सध्या सुरू आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील आदिवासी समर्थक हा संभ्रम निर्माण करीत आहेत, असा खळबजनक आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जळगाव येथे धनगर समाज मेळाव्यात बोलताना केला.

धनगर समाजाची जागर यात्रा संपल्यानंतर आदिवासी समाजाला 'एसटी' चे प्रमाणपत्र मिळावे, यासाठी आपण आंदोलन करून त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत, अशी घोषणाही पडळकर यांनी केली.

आरक्षणाशिवाय धनगर समाज गप्पा बसणार नाही

'धनगर समाजाला 'एसटी'चे आरक्षण मिळावे, यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्रभर जागर यात्रा काढली आहे. त्या निमित्ताने ते जळगाव येथे आले होते. छत्रपती संभाजी महाराज नाट्यसंकुलात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ''एसटी'चे आरक्षण घेतल्याशिवाय धनगर समाज आता गप्प बसणार नाही. समाजाला आदिवासी समाजाचा विरोध असल्याचे सांगितले जात आहे. आदिवासी जातीचा धनगर समाजाला कोणताही विरोध नाही. कारण अद्यापही ९० टक्के धनगर समाजाला एसटीचे आरक्षण मिळालेले नाही. त्यांना ते आरक्षण मिळावे, यासाठी आपण स्वत: त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत. धनगर समाजाची जागर यात्रा पूर्ण झाल्यावर आदिवासी समाजासाठी आपण राज्यभर लढा उभारणार आहोत', असे पडळकर बोलले.

'आज आदिवासी समाजही धनगर समाजाबरोबर आहे. मात्र, केवळ शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समर्थक संभ्रम निर्माण करून धनगर समाजाला फितविण्याचे काम करीत आहेत. परंतु आता त्यांनी कितीही विरोध केला तरीही त्यांचा फायदा होणार नाही. आता आदिवासी समाजाला मिळणारे आरक्षण अंतिम टप्प्यात आहे आणि ते मिळणारच आहे', असा विश्वास पडळकर यांनी व्यक्त केला.

'धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबतची सुनावणी आता उच्च न्यायालयात शेवटच्या टप्प्यात आली आहे. ११ डिसेंबरपासून तीन दिवस केवळ धनगर समाजाच्या आरक्षणावरच सुनावणी होणार आहे. समाजाला बिरोबा, खंडोबाचा आशीर्वाद आहे. निश्‍चितच समाजाच्या बाजूने निकाल लागणार आहे. शेवटचे तीन महिने समाजासाठी महत्त्वाचे आहेत. समाज जागा राहिला पाहिजे म्हणून आपण महाराष्ट्रभर धनगर जागर यात्रेचे आयोजन केले आहे', असेही आमदार पडळकर यांनी या वेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT