Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात पिंप्री मोंढाळे येथे दोन एकर शासकीय गायरान जमिनीचे बनावट कागदपत्रे तयार करून ती हडपल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी तत्कालीन सात ग्रामसेवक, आठ सरपंच तसेच तब्बल 40 भूमाफियांवर फौजदारी तसेच प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते गुलाबराव पाटील यांनी हे प्रकरण उघडकीस आणले असून ते गेल्या साडेचार वर्षांपासून याप्रकरणाचा पाठपुरावा करत होते. तेव्हा कुठे आता या प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे. तब्बल साडेचार वर्षांच्या संघर्षानंतर प्रशासनाने या गैरव्यवहाराची गंभीर दखल घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयितांनी पिंपरी मोंढाळे येथील गट क्रमांक 140 आणि सर्व्हे क्रमांक 84 मधील सरकारी गायरान जमिनीचे बनावट नमुना नंबर 8 चे उतारे तयार केले. या बनावट उताऱ्यांवर सक्षम शासकीय अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या व शासकीय शिक्के मारून ती जमीन खासगी मालकीची असल्याचे भासवले. त्यानंतर तत्कालीन 7 ग्रामसेवक आणि 8 सरपंचांच्या संगनमताने व अधिकाराचा चुकीचा वापर करत या बोगस नोंदी चक्क ग्रामपंचायतीच्या अधिकृत दप्तरी नोंदवण्यात आल्या. (Jalgaon News)
विशेष म्हणजे पारोळा दुय्यम निबंधक कार्यालयाने जमिनीची मूळ मालकी न तपासता या जमिनीचे तब्बल 22 वेळा खरेदी-विक्रीचे व्यवहार नोंदवले. कागदपत्रे नावावर होताच भूमाफियांनी तिथे पक्की बांधकामे, शेततळे आणि पोल्ट्री फार्म उभारून प्रत्यक्ष कब्जा मिळवल्याचे समोर आले आहे . ही जमीन पुढे अनेक सर्वसामान्यांना विकली गेली, ज्यामुळे एक मोठी फसवणुकीची साखळी निर्माण झाली.
7 तत्कालीन ग्रामसेवक, 8 सरपंच दोषी
तत्कालीन ग्रामसेवक डी. बी. पाटील, महेंद्र सोनवणे, एन. आर. चंद्रे, (कै.) दिलीप पाटील, राजेंद्र सोनवणे, हरिभाऊ मारवडकर, जगदीश बाविस्कर, तत्कालीन सरपंच राजेंद्र भीमराव पाटील, कैलास राघो पाटील, मीराबाई पाटील, गंभीर नत्थू पाटील, लताबाई पाटील, राजेंद्र भगवान पाटील, विजय भावराव पाटील, गोकूळ विसावे, प्रभारी सरपंच पुष्पा पाटील अशी जमीन लाटणाऱ्यांची नावे आहेत. या सर्वांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दोषी ठरवण्यात आले आहे. आता या सर्वांवर गुन्हे केव्हा दाखल होतात, याकडे लक्ष लागले आहे.
जमीनी पुन्हा सरकारच्या ताब्यात घेणार
महसूल विभागाला या जमिनी पुन्हा सरकारी ताब्यात घेण्याचे आणि अतिक्रमणे काढण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच चौकशी समितीला सहकार्य न केल्याने गटविकास अधिकारी संजय तुकाराम मोरे यांच्यावरही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.