Dr. Bharti Pawar
Dr. Bharti Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dr. Bharti Pawar: लम्पीबाधित भागातील शेतकऱ्यांना मदत करणार

Sampat Devgire

सिन्नर : देशात गोवंश पशुधनास (Cattle wealth) लम्पी व्हायरसने (Lumpy virus) ग्रासले आहे. या संदर्भात केंद्र सरकारकडून (Centre Government) सर्व राज्य सरकारांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून, शेतकऱ्यांपर्यंत शक्य होईल तेवढी मदत तातडीने पोचवली जात आहे. लम्पी आजार संसर्गजन्य असल्याने शेतकऱ्यांनी (Farmers) सतर्क राहावे, घरातील व परिसरातील जनावरांना बाधा जाणवली, तर तत्काळ पशुसंवर्धन विभागास सूचना करावी, असे आवाहन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी केले. (Centre minister of state Dr Bharti Pawar visits lumpy affected area in Sinner)

डॉ. भारती पवार यांनी सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे भेट देऊन लम्पी व्हायरसने संसर्गित झालेल्या जनावरांची पाहणी केली. पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी व शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी सरकारकडून सर्व उपाययोजना केल्या जातील, असे सांगितले.

जिल्ह्यात २४ ठिकाणी लम्पी संसर्गित जनावरे आढळून आली. त्यापैकी अठरा गायी बऱ्या झाल्या आहेत. बाधित जनावरांवर प्रशासनाकडून योग्य पद्धतीने उपचार होत असल्याने सुदैवाने एकाही जनावराचा मृत्यू झाला नाही. गेल्या वर्षी नाशिक जिल्ह्यात बहुतांशी जनावरांचे लसीकरण करण्यात आले होते. त्यावेळीही लम्पीचा प्रादुर्भाव झाला होता. मात्र लशीकरणाचे प्रमाण अधिक असल्याने नुकसान झाले नव्हते. कदाचित गेल्या वर्षीच्या लसीकरणाच्या प्रभावामुळे यंदा प्रादुर्भाव झाला असला तरी सुदैवाने जनावरे सुरक्षित आहेत.

प्रशासन जनावरांची पुरेशी काळजी घेत आहे. बाधित जनावरांना केंद्राच्या नियमावलीनुसार पाच किलोमीटरचा परिसर ‘बफर झोन’ म्हणून घोषित करून तेथे प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहे. बाधित क्षेत्रात १६ हजार पाचशे जनावरे असून त्यापैकी १२ हजार जनावरांचे लसीकरण झाले आहे. शनिवारपर्यंत सर्व जनावरांचे लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सौ. पवार यांनी सांगितले.

जिल्हा परिषद पातळीवर पशुसंवर्धन विभागाने लसीकरण मोहीमेची माहिती अद्ययावत करून प्रत्येक जिल्ह्यासाठी पोर्टल विकसित करावे. त्यात प्रत्येक पाळीव जनावराची इत्यंभूत माहिती संकलित करावी. लम्पी व्हायरस संदर्भात लसीकरणाचा डिजिटल डॅशबोर्ड बनवल्यास बाधित जनावरांची माहिती, त्यांच्यावर होणारे उपचार याबाबत योग्य माहिती मिळेल. अशी सूचना मंत्री पवार यांनी केली.

उपविभागीय अधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार प्रशांत पाटील, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मधूकर मुरकुटे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे, तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे, सरपंच स्मिता निकम यांसह परिसरातील पशुपालक व शेतकरी यावेळी उपस्थित होते.

ज्या भागात लम्पी वायरस बाधित जनावरे आहेत तेथे पाच किलोमीटरच्या परिघात लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. येथील सर्वच जनावरांचे लसीकरण करण्यात येत असून, त्यासाठी शेतकऱ्यांना कुठलाही आर्थिक भार उचलावा लागणार नाही.

- भारती पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT