Wine producer Jagdish Holkar
Wine producer Jagdish Holkar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

द्राक्ष उत्पादकांचा इशारा, ‘वाइन’चा अपप्रचार थांबवा!

Sampat Devgire

नाशिक : वाइन (Wine) आरोग्‍यवर्धक पेय असून, पाच राज्‍यांत स्‍थानिक फळांपासून वाइननिर्मिती होते. स्‍थानिक शेतकऱ्यांना शाश्‍वत उत्‍पन्न मिळत आहे. त्‍यामुळे या विषयावर राजकारण करू नये. वाइनबाबत अपप्रचार तातडीने थांबावावा. वाइन उद्योगाला प्रोत्‍साहन मिळावे, अशी भूमिका अखिल भारतीय वाइन उत्पादक संघटनेचे अध्यक्ष जगदीश होळकर (Jagdish Holkar) यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

ते म्हणाले, राज्‍यात २०१३ पासूनच ‘शेल्फ इन शॉप’ या प्रकारातून मॉल्‍समध्ये वाइन विक्री सुरू होती. आता केवळ एक हजार स्‍क्‍वेअर फुटांच्‍या मॉलची अट समाविष्ट केलेली आहे.

राज्‍य शासनाने वाइन विक्रीला दिलेल्‍या परवानगीवरून राजकारण ढवळून निघालेले असताना, श्री. होळकर व अन्‍य पदाधिकाऱ्यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत संघटनेची भूमिका मांडली. श्री. होळकर म्‍हणाले, की वाइन विक्रीचा विषय वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्‍न होतो आहे. यापूर्वी २०१३ पासूनच मॉल्‍समध्ये वाइन विक्रीस परवानगी होती. अटीत बदल करताना ‘शेल्‍फ इन शॉप’ याअंतर्गत विक्रीस परवानगी दिलेली आहे. त्‍यामुळे राजकारण्यांनी दिशाभूल तातडीने थांबवत समाजात गैरसमज पसरवायला नको.

महाराष्ट्राच्‍या निर्णयानंतर कर्नाटकमधील मंत्र्यांनी अभ्यासगट नेमला असून, ही समिती लवकरच महाराष्ट्रास भेट देणार आहे. या दौऱ्यात ते राज्‍य शासनाच्‍या धोरणाचा अभ्यास करणार आहेत. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश अशी भाजपशासित राज्‍ये वाइन उद्योगाला प्रोत्‍साहन देण्यासाठी अनुकूल आहेत. महाराष्ट्रात होणारे राजकारण मात्र दुर्दैवी असल्‍याचे होळकर यांनी नमूद केले. परदेशातील वायनरी आयात शुल्‍क कमी करण्यास आग्रही असून, अशात स्‍थानिक वाइन उत्‍पादकांना प्रोत्‍साहन देणे अधिक महत्त्वाचे असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

द्राक्ष उत्‍पादक बागायतदार संघाचे कैलास भोसले म्‍हणाले, की राज्‍य शासनाच्‍या निर्णयाचे स्‍वागत आहे. राजकीय व्‍यक्‍तींनी विरोध करण्याआधी द्राक्ष उत्‍पादकांना भेटून सत्‍य परिस्‍थिती जाणून घ्यायला हवी. राजकारणासाठी भरपूर मुद्दे असून, या मुद्द्यांवर राजकारण करू नये. प्रोत्‍साहनातून हजारो वायनरी उभ्या राहिल्‍या पाहिजेत. या वेळी किरण चव्‍हाण, सदाशिव नाठे, विजय घुमरे यांनीही मनोगत व्‍यक्‍त केले.

मागेल त्‍याला वाइन शॉप मिळावे

वाइन उत्‍पादक महेंद्र भामरे म्‍हणाले, की राज्‍य शासनाच्‍या निर्णयाचा बाऊ करायला नको. मद्य विक्री दुकानांना लिकर शॉप असे नाव द्यावे, तर मागेल त्‍याला वाइन शॉप देत वाइन उद्योगाला प्रोत्‍साहन देण्याची आवश्‍यकता आहे.

केवळ सहाशे मॉल पात्र

राज्‍य शासनाच्‍या सध्याच्‍या धोरणानुसार राज्‍यातील केवळ सहाशे शॉपिंग मॉल वाइन विक्रीसाठी पात्र ठरणार असल्‍याची माहिती अश्‍विन रॉड्रिक्‍स यांनी दिली. त्यामुळे किराणा दुकान, स्‍वस्‍त धान्‍य दुकानातून आता वाइन विक्री होईल, असा अपप्रचार थांबवायला हवा. बिअर व लिकरच्‍या तुलनेत वाइन विक्रीतून शेतकऱ्यांना सर्वाधिक उत्‍पन्न मिळत असल्‍याचे त्‍यांनी या वेळी नमूद केले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT