Cityzen burning garbage in Dhule.

 

Sarkarnama

उत्तर महाराष्ट्र

धुळेकर म्हणतात, अच्छे दिन आयेंगे... पण कधी?

शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग, लाखोंच्या घंटागाड्या बेवारस स्थितीत.

Sampat Devgire

धुळे : शहरातील कचरा संकलनाचे (Garbage collection) काम नवीन कंत्राटदाराकडून सुरू होईल, असे सांगून महापालिकेच्या सत्ताधारी आणि प्रशासनाने (Dhule Municiple corporation) कचऱ्याप्रश्‍नी ‘हाताची घडी-तोंडावर बोट’ अशी भूमिका घेतल्याचे चित्र आहे. नवीन कंत्राटदार काम सुरू करेपर्यंत काय, या प्रश्‍नाबाबत कुणीही बोलायला तयार नसल्याने शहराचे पालकत्व असलेल्या महापालिकेचा कारभार चर्चेचा विषय आहे.

ज्या कंत्राटदारामुळे संपूर्ण शहराचा कचरा झाला त्याच कंत्राटदाराकडून पर्यायी व्यवस्था होईपर्यंत काम करून घेण्याचा अट्टाहास महापालिकेतील सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाने राबविल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून कचऱ्याची समस्या अधिकाधिक बिकट होत आहे. आज शहराच्या कोणत्याही भागात कचऱ्याचेच साम्राज्य पाहायला मिळत असताना हे चित्र बदलायला कुणीही तयार नाही. केवळ नवीन कंत्राटदाराला काम देण्याची कार्यवाही सुरू आहे, अशी गुळमिळीत उत्तर देऊन पदाधिकारी, अधिकारी मोकळे होत आहेत.

नवीन कंत्राटदार काम सुरू करेल तोपर्यंत शहराचे डंपिंग ग्राउंड होऊ द्यायचे का, असा प्रश्‍न आहे. शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी असताना हे चित्र कुणीही बदलायला तयार नाही ही शोकांतिका आहे. अनेक ठिकाणी कचऱ्याचे हे ढीग आता सहन करण्यापलीकडे गेल्याने नागरिक हा कचरा जाळून टाकत आहेत.

संपूर्ण धुळे शहरवासीयांच्या प्राथमिक गरजा, सोयी-सुविधा पुरविण्याची जबाबदारी, पालकत्व महापालिकेकडे आहे. यासाठी महापालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र याच गरजा पूर्ण होत नसतील किंवा समस्या गंभीर बनत असेल तर महापालिकेचा उपयोग काय, असा प्रश्‍न आता नागरिकच उपस्थित करत आहेत. काही नागरिक तर अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी, पदाधिकाऱ्यांना मिरविण्यासाठी कररूपी पैसा द्यायचा का, असा सवाल करताना दिसतात. त्यांचा हा प्रश्‍न रास्त असल्याचेच पाहायला मिळते.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT