Hemant Godse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Hemant Godse : महायुतीत खटके उडाले, "समीर भुजबळ यांनी माघार घ्यावी"

Serious allegations on Chhagan Bhujbal spark conflict within Mahayuti: शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केल्याने महायुतीत चांगलेच खटके उडाले आहेत.

Sampat Devgire

Nashik News: छगन भुजबळ हे गद्दार आहेत, असा थेट आरोप शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी खासदार हेमंत गोडसे यांनी केला. आज झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी मंत्री भुजबळ यांचे सगळेच काढले. यानिमित्ताने महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे.

काही उमेदवारांनी अद्याप माघार घेतलेली नाही. त्यामुळे महायुतीत बंडखोरी कायम आहे. ही बंडखोरी शमविण्यासाठी नेत्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यातच या नव्या वादामुळे महायुतीत सर्व काही आलबेल नाही, हे स्पष्ट झाले आहे.

आज माजी खासदार हेमंत गोडसे यांनी समीर भुजबळ आणि मंत्री छगन भुजबळ यांना टीकेचे लक्ष्य केले. या निमित्ताने त्यांनी लोकसभा निवडणुकीतील आपल्या पराभवाला मंत्री भुजबळ जबाबदार असल्याचे त्यांनी थेट सांगितले. त्यामुळे आता भुजबळ आणि शिंदे गटात वादाचा नवा अध्याय सुरू होण्याची चिन्हे आहेत.

माजी खासदार गोडसे म्हणाले, छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीचा धर्म पाळला नाही. त्यांनी निवडणुकीत पाठीत खंजीर खुपसला. `दुपारी तीन वाजेला मतदान करा` असा प्रचार भुजबळांनी केला. वस्तूत: शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार खासदार राजाभाऊ वाजे यांचा अनुक्रमांक तीन होता. यावरून भुजबळ यांची भूमिका काय होती, हे स्पष्ट होते.

यावेळी खासदार गोडसे यांनी समीर भुजबळ यांच्या बंडखोरीबाबतही गंभीर आरोप केला. ते म्हणाले, केवळ पक्षाचे पद अथवा राजीनामे देऊन चालणार नाही. समीर भुजबळ यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी मागे घेतली पाहिजे. त्याशिवाय अन्य कोणताही पर्याय चालणार नाही.

राज्यात अजूनही काही ठिकाणी महायुतीच्या बंडखोरांनी निवडणुकीतून माघार घेतलेली नाही. त्याबाबतचा निर्णय झाल्यावर आम्ही देखील पुढील निर्णय घेऊ. नांदगाव मतदारसंघात समीर भुजबळ यांनी उमेदवारी केल्याने महायुतीतील वातावरण खराब झाले आहे. समीर भुजबळ यांनी बंडखोरी केल्यानेच वातावरण बिघडले. त्यामुळे त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली पाहिजे.

यांच्या परिवार वादावरही माजी खासदार गोडसे यांनी शेलक्या शब्दात समाचार घेतला. ते म्हणाले, एका मुलाला राज्यपाल नियुक्त आमदार केले आहे. कुटुंबातील हे दोघे निवडणूक लढत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. याची सर्वस्वी जबाबदारी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे जाते. त्यांनी याबाबत स्पष्ट भूमिका घेऊन महायुतीतील वातावरण सुरळीत करण्यासाठी पुढे यावे.

शिवसेना शिंदे गटाच्या दोन उमेदवारांच्या विरोधात अद्यापही बंडखोर आहेत. त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली नाही. त्यामुळे ती माघारी झाल्यानंतरच देवळाली विधानसभा मतदारसंघाबाबतचा निर्णय होईल. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाने आपले उमेदवार द्यावेत, अशी सर्वांची भूमिका होती. त्यामुळे पक्षाने चर्चा करून हा निर्णय घेतला आहे, असे संकेत त्यांनी दिले.

लोकसभेच्या निवडणुकीत मंत्री भुजबळ यांनी माजी उमेदवारी केंद्रातून निश्चित झालेली आहे, असे सांगितले होते. मात्र ऐनवेळी त्यांनी निवडणुकीतून पळ काढला. त्यामुळे याबाबतचे सर्व निर्णय होऊन नेत्यांचे समाधान झाले पाहिजे. त्याशिवाय शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देवळाली मतदारसंघात कोणाचाही प्रचार करणार नाही, असा निर्णय आज झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात घेण्यात आला, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आज शिवसेना शिंदे पक्षाचे माजी खासदार गोडसे यांनी मंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांना थेट लक्ष केले आहे. त्यामुळे महायुतीत पक्षांतर्गत समन्वय आणि वातावरण काय आहे, याचा संदेश गेला आहे. आगामी काळात त्याचे पडसाद उमटलेले दिसतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT