Prof. Jogendra Kawade Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

हिंदुत्ववादी संघटना दलित, आदिवासींच्या विरोधात!

पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे. यांनी मनमाड येथे पत्रकारांशी संवाद साधला.

Sampat Devgire

मनमाड : मुस्लिम (Muslims) महिलांनी हिजाब (Hijab) परंपरेनुसार भीती न बाळगता त्याचा वापर करावा. मुस्लिम विद्यार्थी त्यांच्या परंपरेनुसार हिजाब घालत असतील आणि त्यांना विरोध केला जात असेल तर ही बाब चिंताजनक आहे. हिंदुत्ववादी संघटना अल्पसंख्याक, दलित, आदिवासींच्या विरोधात आहे. जाणीवपूर्वक भीती आणि दहशत पसरवत असल्याची टीका पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे (Jogendra Kawade) यांनी केले.

पाटोदा (ता. येवला) येथील नेते संग्राम पगारे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या दशक्रिया विधिनिमित प्रा. कवाडे येथे आले होते. त्यावेळी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. या वेळी पक्षाचे नेते प्रकाश चावरीया, मोगल आहिरे, आनंद शिनगारे, दयानंद घोडके, अरविंद चावरिया, प्रवीण ठोंबरे, अॅड. अली, जितेंद्र ढेंगळे आदी उपस्थित होते.

प्रा. कवाडे म्हणाले, आरएसएसप्रणित भाजपचे सरकार जेव्हापासून देशात आले तेव्हापासून ‘हिंदू खत्रे मे है’ असे सर्वत्र पसरवले जात आहे. मात्र, मोदी नव्हते तेव्हा हिंदू असुरक्षित नव्हता. भाजपची सत्ता येताच हिंदू असुरक्षित झाला. यापूर्वी देशावर मुघल, ब्रिटीशांचे राज्य असतानादेखील कधीच हिंदू असुरक्षित नव्हता, हिंदू असुरक्षित नाही तर ब्राह्मणवाद असुरक्षित आहे. जात, धर्मापेक्षा देश मोठा असतो. हिंदुत्वाच्या नावाखाली घोषणा देणारे देशाला बुडवतील, अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली.

आगामी निवडणुका स्वबळावर

आगामी निवडणुका पीपल्स रिपब्लिकन पक्षाने स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. पीपल्स रिपब्लिकन पक्ष आघाडी सरकारमध्ये होता. परंतु, आघाडीतील पक्षांनी नीतिमत्ता दाखवली नाही. निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मदत करून देखील त्यांनी मित्रपक्षाला वाऱ्यावर सोडले. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी आम्ही नवीन राजकीय मित्र शोधत आहोत. जे आमच्या पक्षाला सन्मानपूर्वक वागणूक देतील त्यांच्यासोबत आम्ही नक्कीच राहू. असे असले तरी महाराष्ट्रातील आघाडी सरकार पाच वर्षे टिकेल, असा विश्‍वास प्रा. कवडे यांनी व्यक्त केला.

देशाच्या एकात्मतेला जाणीवपूर्वक सुरूंग

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची राज्यघटना निर्माण केली. त्यात सर्व जाती- धर्माच्या लोकांना न्याय देण्याची हमी दिली. प्रत्येक धर्माच्या लोकांना त्यांच्या रूढी- परंपरा, संस्कृतीप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. असे असताना या देशांमध्ये जाती-धर्माचे ध्रुवीकरण करून देशांमध्ये धार्मिक अंतर निर्माण केले जात आहे. देशाच्या एकात्मतेला जाणीवपूर्वक सुरुंग लावण्याचा प्रयत्न काही संघटनांकडून केला जात आहे. त्यावर मोदी सरकार काहीही बोलत नाही. देशाची एकात्मता टिकवण्यासाठी आरएसएस आणि त्यांच्या संघटनांवर नियंत्रण लावण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. देशात जेथे जेथे भाजप सरकार आहे, तेथे जाणीवपूर्वक जातीय दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यावर कठोर कारवाईची गरज प्रा. कवाडे यांनी व्यक्त केली.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT