Former MLA Narendra Darade files his nomination for the Nashik Legislative Council election amid growing political tensions within the Mahayuti alliance. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik MLC Election : निवडणुकीनंतर दराडेंनी जमिनीवर राहावे; भुजबळ समर्थक आमदाराचा नरेंद्र दराडेंना सल्ला, कामकाजावर नाराजी

Hiraman Khoskar On Narendra Darade : नाशिक विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर यांनी नरेंद्र दराडेंवर नाराजी व्यक्त केली आहे.

Ganesh Sonawane

Maharashtra Politics : महायुतीत सर्व काही 'ऑल इज वेल' असल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांकडून सातत्याने केला जात असला तरी नाशिक विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार नरेंद्र दराडे यांच्या कामकाजावर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

एकीकडे, दराडे यांच्या विजयासाठी महायुतीच्या नेत्यांकडून तीन्ही पक्षांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले जात आहे. खबरदारी म्हणून मतदारांना सहलीवर नेलं जात आहे. असे असताना आमदार हिरामण खोसकर यांनी उमेदवार तथा आमदार नरेंद्र दराडे यांच्या कामकाजावर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

दोन दिवसांपूर्वी नरेंद्र दराडे यांच्या विजयासाठी नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील एका हॉटेलमध्ये महायुतीची बैठक झाली होती. महायुतीच्या तीन्ही पक्षांचे मंत्री व आमदार या बैठकीत उपस्थितीत होते. राष्ट्रवादीचे मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार माणिकराव कोकाटे, नितीन पवार, दिलीप बनकर, पंकज भुजबळ आदी उपस्थित होते. मात्र, आमदार हिरामण खोसकर बैठकीस अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.

दरम्यान, आता खोसकर यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे त्यात त्यांनी नरेंद्र दराडे यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. निवडणुकीनंतर दराडे यांनी जमिनीवर राहावे. आपल्या कामकाजात सुधारणा करावी. गेल्या निवडणुकीत आपण त्यांना मदत केली होती. मात्र सहा वर्षांत त्यांनी मतदारसंघात अपेक्षित कामे केली नसल्याने मतदारांमध्ये नाराजी असल्याचा दावा खोसकर यांनी केला. यातून महायुतीमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.

दरम्यान, हिरामण खोसकर यांची छगन भुजबळ यांचे समर्थक आमदार म्हणून ओळख आहे. एकीकडे, छगन भुजबळांनी महायुतीची भूमिका मान्य असल्याचे सांगितले असले तरी, त्यांचे समर्थक व राष्ट्रवादीचेच आमदार खोसकरांनी दराडेंविरोधात भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तथापि, या टीकेसोबतच त्यांनी महायुतीचा धर्म पाळत विधान परिषद निवडणुकीत दराडे यांना पाठिंबा देणार असल्याचेही स्पष्ट केले. त्यामुळे एका बाजूला समर्थन आणि दुसऱ्या बाजूला नाराजी अशा दुहेरी भूमिकेमुळे राजकीय चर्चांना जोर आला आहे.

शिवाजी सहाणेंचा खोसकरांना टोला

खोसकर यांच्या विधानावरुन गेल्या विधान परिषद निवडणुकीतील पराभूत उमेदवार शिवाजी सहाणे यांनी फेसबुक पोस्टद्वारे खोसकर यांच्यावर टीका करत गंभीर आरोप केला आहे. ‘खोसकरसाहेब, २०१८ मध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकृत उमेदवार होतो. त्या वेळी तुम्ही विरोधी उमेदवार नरेंद्र दराडे यांना मदत करून पक्षविरोधी काम केले, याचा हा कबुलीजबाब समजायचा का?’ असा सवाल सहाणे यांनी उपस्थित केला आहे.

तसेच, ‘अजित पवार यांच्या कृपेने तुम्ही आमदार झाला आहात. माझ्या निवडणुकीचे सूत्रधारही अजित पवारच होते. मग त्यांनाही तुम्ही धोका दिला, असे म्हणायचे का?’ असा टोला सहाणे यांनी खोसकर यांना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT