Namdeo shinde with leaders
Namdeo shinde with leaders Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

‘रासाका’ची चिमणी पेटताच दोन वर्षानंतर त्यांनी समारंभपूर्वक चप्पल घातली!

Sampat Devgire

निफाड : रानवड साखर कारखाना बंदने अनेकांची मालवलेली चूल...दोन वेळचा हिरावलेला सुखाचा घास पुन्हा पोटात जावा यासाठी दोन वर्षांपासून अनवाणी फिरणारे नामदेवकाका शिंदे यांनी कारखाना सुरू होताच आमदार दिलीप बनकर यांच्या उपस्थितीत पुन्हा चप्पल घातली.

शिवडी (ता.निफाड) येथील सोसायटीचे माजी चेअरमन नामदेवकाका शिंदे यांनी एक जुलै २०२० ला कर्मवीरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत रासाकाची चिमणी पेटून कारखाना सुरू होत नाही तोपर्यंत पायात चप्पल न घालता अनवाणी राहण्याची प्रतिज्ञा केली होती. त्यांच्या या निर्णयाला कार्यक्षेत्रातील वैभव तासकर, बाबूराव सानप, धोंडिराम रायते, सचिन वाघ, दत्तू मुरकुटे, विकास रायते, लक्ष्मण शिंदे आदी युवकांनी प्रतिसाद दिला अन रासाका बचाव कृती समितीची उभारणी झाली.

रासाका बचाव कृती समितीने रासाका सुरू करावी, या मागणीसाठी निफाड तालुक्यातील सर्वच राजकीय पक्ष गट- तटाच्या नेत्यांना साकडे घातले. कारखाना कोणीही सुरू करावा, अशी अटकळ घालत पायाला भिंगरी लागल्यागत युवकांची ही फळी सतत पाठपुरावा करत राहिली होती. साखर आयुक्त जिल्हाधिकारी मंत्रालय आदी ठिकाणी बचाव कृती समितीने धडक देत रासाका सुरू करण्याच्या मागणीचा रेटा लावून धरला होता. रासाका सुरु करणेसाठी साखळी उपोषणाद्वारे लढा व्यापक केला होता. त्यांच्या या संघर्षाच्या ठिणगीचा पुढे वणवा झाला. रासाका सुरु करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरील तांत्रिक अडचणी दूर झाल्या. आमदार दिलीप बनकर यांच्या नेतृत्वात (स्व.) अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्थेने रासाका भाडेतत्वावर चालविण्यास घेतला. त्याचा शुभारंभ माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते मोळी टाकून झाला आहे. त्यामुळे आमदार बनकर यांच्या उपस्थितीत चप्पल घालून नामदेवकाका शिंदे यांनी आपली प्रतिज्ञा पूर्ण केली.

रानवड सहकारी साखर कारखान्यांच्या सुरू होण्यासाठी रासाका कृती समितीने संघर्ष केला. अखेर आमच्या लढ्याला यश आले. आज रासाका सुरू झाल्याने आमच्या ऊस उत्पादकांच्या घराची एक प्रकारे चूल पेटली आहे. आम्ही केलेले आंदोलन आणि उभारलेल्या लढा यशस्वी झाल्याचे समाधान वाटते.

बाबूराव सानप, रासाका कृती समिती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT