Nashik Municipal Corporation: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहा खासदार फुटल्यानंतर आता आमदार आणि मुंबई महापालिकेतील नगरसेवक गळाला लावण्याचे प्रयत्न एकनाथ शिंदेंकडून सुरू आहेत. फुटीचे हे लोन आता नाशिक महापालिकेपर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे.
सध्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला रोज फाटा फूट आणि ऑपरेशन टायगरच्या चर्चेने त्रस्त केले आहे. ही चर्चा नाशिक महापालिकेपर्यंत पोहोचली आहे. पक्षाचे १२ नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत जाणार अशी चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेकडून या नगरसेवकांना प्रत्येकी दोन कोटी रुपये विकास निधीचे आमिष दाखविले जात आहे.
या चर्चेचे तीव्र पडसाद नाशिक महापालिकेत उमटले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे महानगर प्रमुख प्रथमेश गीते आणि गटनेते केशव पोरजे यांनी यावर प्रतिक्रिया दिली. शिवसेना ठाकरे पक्ष अशा आमिषांना भीक घालणार नाही असा दावा त्यांनी केला.
सध्या महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि शिवसेना स्वतःच्याच अडचणींना सामोरे जात आहे. या पक्षाच्या नगरसेवकांना तोंड उघडण्याची ही परवानगी नाही. सिंहस्थाची सर्व कामे बाहेरच्या कंत्राटदारांना दिली आहेत. त्यावर तोंड उघडल्यास पोलिसांचा खाक्या दाखविला जातो. रामकुंडामध्ये गटारीचे पाणी सोडण्यात आले आहे.
नुकत्याच झालेल्या पावसाने शहर पाण्याखाली गेले. सर्व रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे झाले आहे. या खड्ड्यांमुळे अपघात होऊन नागरिकांना जायबंदी व्हावे लागले. भाजपच्या नगरसेवकाला त्याची झळ बसली आहे.
महापालिकेच्या प्रशासनाची आणि नगरसेवकांच्या कामांची दुरावस्था आहे. नगरसेवकांना आपल्या पक्षाकडून डोळे वटारले जात असल्याने अडचणी आहेत. हे अपयश झाकण्यासाठी ऑपरेशन टायगर आणि फोडाफोडीच्या राजकारणाच्या बातम्या पेरल्या जात असल्याचा दावा पोरजे यांनी केला.
नाशिक महापालिकेच्या नगरसेवकांपर्यंत ऑपरेशन टायगर पोहोचले आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे सध्या १६ नगरसेवक आहेत. त्यातील १२ नगरसेवक शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चेने अस्वस्थता पसरली आहे. शिवसेनेच्या नेत्यांमध्ये श्रेय घेण्यासाठी कोण नगरसेवक फोडतो? अशी स्पर्धा लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.