Chhagan Bhujbal at Yeola
Chhagan Bhujbal at Yeola Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

माझी पतंग वाचवता- वाचवता थकलोय, पण अजून रडणार नाही...

Sampat Devgire

येवला : माझीच पतंग प्रत्येक जण कापण्यासाठी तयार असतो, तेव्हा मी कोणाची पतंग कापणार? पतंग कापण्याचा धंदा, पण केलेला नाही. उलट माझी पतंग वाचवता- वाचवता मी थकलोय, पण अजून रडणार नाही...कितीही केसेस केल्या आणि कोर्टात उभे राहिले तरी त्याची काळजी नाही..अशी शाब्दिक कोटेबाजी करत कोणाची पतंग कापणार नाही अन माझीही कटू देणार नाही असा संदेश देत पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी येथील पतंगोत्सवाचा आनंद लुटताना मनातील खदखद व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे हेविवेट नेते छगन भुजबळ म्हणजे वकृत्वातील माहीर नेते.. कधी काय गुगली टाकतील आणि कधी कुणाचा पतंग काटतील याचा नेम नाही.. आजही त्यांनी पतंगोत्सवाच्या निमित्ताने राजकीय आणि सामाजिक घडामोडींविषयी बोलकी प्रतिक्रिया देऊन सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. आता तुम्ही कोणाची पतंग कापणार या पत्रकारांच्या प्रश्नावर भुजबळ यांना विचारले असता त्यांनी पतंगाच्या शैलीत उत्तर दिले.

मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर येथील पतंगोत्सवात सहभागी होत भुजबळ यांनी पतंगोत्सवाचा आनंद घेतला. यापूर्वी मकरसंक्रांतीला आल्यावर भुजबळ नेत्यांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या घराच्या गच्चीवर जाऊन पतंग उडवायचे. यावेळी मात्र कोरोना नियमांची काळजी घेत येथील स्वतःच्या कार्यालयाच्या गच्चीवर त्यांनी पतंग उडविला.

प्रथम कुणीही असो, राजकीय की खराखुरा भुजबळ त्याला उंच भरारी देतातच हेही आज पुन्हा एकदा त्यांनी दाखविले. अगोदर आसारीला ढील देत त्यांनी पतंगाला आकाशात उंच भरारी दिली, त्यानंतर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक लोणारी यांच्या हातात आसारी देऊन दोरा मात्र स्वतःकडे ठेवत त्यांनी पतंगाला उंचच उंच नेला. खरेतर दरवेळी एखादा प्रमुख नेता त्यांच्या सोबत आसारी पकडायला असतो, यावेळी ही उणीव असली तरी त्यांनी ती जाणवू दिली नाही किंबहुना माझा पतंग मी वाचणारच असे न्यायालयाच्या अनुषंगाने सांगत असताना येथील राजकारण राजकीय पटलावर देखील आपली पतंग अधिक उंच उंच भरारी घेत राहील असाही जणू संदेश दिला. असे कितीही पतंग आले आणि गेले तरी भुजबळ या खेळात आपला पतंग नक्कीच अधिक उंचावर नेत राहतील असा आशावाद देखील कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

जिल्हा परिषदेचे सभापती संजय बनकर, बाजार समितीचे मुख्य प्रशासक वसंतराव पवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नगरसेवक दीपक लोणारी, स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, गटनेते मोहन शेलार, राधाकिसन सोनवणे, संतोष खैरनार, सुनील पैठणकर, ज्ञानेश्वर शेवाळे, सचिन कळमकर आदी उपस्थित होते.

वीजकंपनी वाचविणे हे कर्तव्यच

वीज कंपनी वाचवणे आपले कर्तव्य असल्याचे सांगत भुजबळ यांनी सत्यगाव, साताळी येथील कार्यक्रमात देखील फटकेबाजी केली. जिल्ह्यातील विजेच्या कामांसाठी ३५ कोटी काढून ठेवले असून छोटे-मोठया कामाकरिता कोणाकडे जाण्याची गरज भासणार नाही. ऊर्जामंत्र्याबरोबर बैठक घेऊन शेतकऱ्यांचे विजेसंदर्भातील प्रश्न मांडणार असल्याचे भुजबळ म्हणाले. आज ५० ते ६० हजार कोटीचे कर्ज वीज कंपनीवर असून ते कर्ज बुडाले की केंद्र सरकार वीज कंपनी अदानी-अंबानीकडे देणार...मग तुम्हाला त्यांच्याकडून कोणतीही सबसिडी काही मिळणार नाही. त्यामुळे वीजकंपनी वाचवणे आपले कर्तव्य असून ती वाचवा असे आवाहन त्यांनी केले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT