Narayan Rane
Narayan Rane Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

मी सेना मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची चोपडी खोलेल!

Sampat Devgire

नाशिक : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपच्या (BJP) काही नेत्यांची नावे ईडी कार्यालयाकडे पाठविल्याच्या वक्तव्याचा समाचार घेताना केंद्रीय लघुउद्योगमंत्री नारायण राणे (Narayan Rane)यांनी जशास तसे उत्तर देताना राऊत यांनी चांगली सुरवात केली आहे. आता सेनेच्या नेत्यांची भ्रष्टाचाराची चोपडी माझ्याकडे असल्याने ती खुली करेन, असे आव्हान शिवसेनेला दिले.

‘आयटी कॉनक्लेव्ह-२०२२’च्या कार्यक्रमासाठी आलेल्या केंद्रीय मंत्री राणे यांनी मंगळवारी (ता. १) माध्यमांशी संवाद साधताना शिवसेनेला पुन्हा निशाण्यावर घेतले. ते म्हणाले, की सरकारी यंत्रणांना वेठीला धरणे, नियमबाह्य कामकाज करणे, हे महाविकास आघाडी सरकारचे धोरण आहे. दिशा सालियानच्या केसमध्ये सचिन वाजेचा उपयोग करून घेतला. दिशा सालियनसह सुशांतसिंह राजपूत, पूजा चव्हाण प्रकरण दडपण्यासाठी सारवासारव केली जात आहे.

दिशा सालियानची बदनामी केल्याने गुन्हा दाखल केला. दिशा अडीच वर्षांपासून आई-वडिलांसोबत राहत नव्हती. आम्ही दिशाची बदनामी केली नाही. उलट तिच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी, तिला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केल्याने आमचे आभार मानायला हवे होते. या प्रकरणात सत्य बाहेर आल्यानंतर शिवसेनेचा एक मोठा नेता तुरुंगामध्ये जाईल. त्यामुळे सरकारकडून अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे. शिवसेनेच्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराची चोपडी आमच्याकडे आहे. सीबीआय व ईडी या संस्थांव्यतिरिक्त अन्य कुठल्याही संस्था मोठ्या नाहीत.

त्यामुळे राऊत यांनी राज्यातील तपास यंत्रणांना भाजपच्या नेत्यांची यादी दिली तर मी सेनेच्या नेत्यांची यादी केंद्रीय तपास यंत्रणांना देईन. संजय राऊत यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचा आशीर्वाद आहे. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था धोक्यात आहे. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागण्याचे सुधीर मुनगंटीवार यांचे भाकीत खरे ठरावे, असे राणे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचा दावा राणे यांनी केला.

युक्रेनमधून विद्यार्थी सुखरूप

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार मंत्र्यांकडे जबाबदारी दिली आहे. केंद्राच्या या प्रयत्नांबाबत विरोधकांनी समाधान मानायला हवे. युक्रेनमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत मदत पोचविली जाईल. सगळ्यांना सुखरूप घरी आणले जाईल, असे सांगताना राणे यांनी या विषयातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. मंगळवारी सांताक्रूझ विमानतळावर ८२ विद्यार्थ्यांना घेऊन विमान उतरले. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी जाणे अपेक्षित होते; परंतु मंत्रालयातही न जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडून काय अपेक्षा करणार, अशी टीका केली.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT