MLA Farook Shaikh
MLA Farook Shaikh Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

चाके असती तर भाजपने महापालिकाही घरी नेली असती!

Sampat Devgire

धुळे : महापालिका (Dhule) इमारतीला चाके असती तर त्यांनी महापालिकासुद्धा घरी नेली असती अशी राजकीय टोलेबाजी करत शहराचे आमदार फारुक शाह (Farook Shah) यांनी महापौरांसह महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर (BJP) शुक्रवारी निशाणा साधला.

शहरातील साक्री रोडच्या डांबरीकरणाचे चार कोटी रुपये खर्चातून दोन टप्प्यात काम होत आहे. त्याचा आमदार श्री. शाह व महाविकास आघाडीतील घटकपक्ष काँग्रेसचे प्रदेश सचिव युवराज करनकाळ यांच्या हस्ते प्रारंभ झाला. यावेळी आमदार शाह यांनी पुन्हा एकदा भाजप खासदारावर टिका करीत, खासदार डॉ. सुभाष भामरे यांचीही पदावनती होणार असून पुढे ते खासदारकीऐवजी आमदारकी लढविणार असल्याचे सांगितले.

काँग्रेसचे नगरसेवक साबीर शेठ यांच्यासह एमआयएमचे नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी आमदार शाह यांना रस्ता डांबरीकरणाची महापौर प्रदीप कर्पे यांनीही पाहणी केल्याबाबत विचारणा केली असता त्यांनी राजकीय टोलेबाजी करत महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर टीका केली.

आमदार शाह म्हणाले, की भाजपने महापालिकेच्या सत्ता काळात महापालिकेची तिजोरी साफ केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे सध्या काहीही काम नाही. महापौरांचीही त्यामुळे सध्या फुकटची फौजदारी सुरु आहे. श्रेय घेण्याचा ते केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. काहीच काम करत नसल्याने धुळ्याच्या खासदारांची पदावनती होणार असून ते आमदारकी लढविणार आहेत असे म्हणत श्री. शाह यांनी खासदार डॉ. भामरे यांच्यावरही निशाणा साधला.

दरम्यान, साक्रीरोड डांबरीकरणासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने निधी मिळाला आहे. गुरुशिष्य स्मारकापासून महिंदळे फाट्यापर्यंतच्या चार कोटीतून रस्त्याचे डांबरीकरण सुरू आहे. पथदिव्यांसाठीही निधी मिळाला आहे. शिवाय मोती नाला पुलाचे रुंदीकरणही लवकर होईल. मोठ्या कामाच्या उद्घाटनाला आघाडीच्या नेत्यांना बोलविण्याचा प्रोटोकॉल असल्याने आम्ही काँग्रेससह आघाडीच्या नेत्यांना निमंत्रण दिल्याचे आमदार श्री. शाह म्हणाले.

आघाडी सरकारकडून निधी

श्री. करनकाळ म्हणाले, की आघाडी सरकारने या कामांसाठी निधी दिला आहे. आमदार फारुक शाह फक्त मुस्लीमबहुल नव्हे तर हिंदू भागांतदेखील काम करत आहेत. कोरोना काळात कुणाला सुचले नाही त्यावेळी त्यांनी ऑक्सिजन प्लांटसाठी पुढाकार घेतला. त्यामुळे चांगल्या कामांसाठी आम्ही एमआयएमसोबत आहोत. काही जण मात्र श्रेयासाठी इकडे-तिकडे फिरत आहेत. त्यांनी उगाच इकडे-तिकडे फिरू नये, आपले काम करावे, असा टोला श्री. करनकाळ यांनीही विरोधकांना लगावला.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT