Congress On Assembly Elections Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Congress On Assembly Elections : काँग्रेसच्या कॉन्फिडन्समुळे आघाडीत वादळापूर्वीची शांतता; नगर जिल्ह्यात एवढ्या जागांवर दावा

Pradeep Pendhare

Mumbai News : विधानसभा निवडणुकीसाठी बिगुल पुढील काही दिवसांत वाजेल. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीत आहेत. नगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीमधील सर्व पक्षांची चाचपणी सुरू आहे.

राजकीय पदाधिकारी आणि नेते पक्षश्रेष्ठींकडे किती जागा लढवायच्या याचा आकडा पाठवत आहेत. यातच काँग्रेसने नगर जिल्ह्यात किती जागा लढवणार याचा मतदारसंघानिहाय आकडा पाठवला आहे. या आकड्यामुळे महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमध्ये वादळापूर्वीचा सन्नाटा पसरला आहे.

मुंबईत काँग्रेस प्रदेश कमिटीची बैठक झाली. या बैठकीत नगर जिल्हा काँग्रेसने (Congress) सात जागांवर दावा केला. नगर उत्तरेतील संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव, अकोला, तर नगर दक्षिणेतील नगर शहर आणि श्रीगोंदा मतदारसंघावर दावा केला आहे. नगर जिल्हा काँग्रेस कमिटीने प्रदेशकडे या सात जागांसाठी आग्रह धरला आहे. या जागांबाबत लवकरच महाविकास आघाडीत संपूर्ण चर्चा होऊन निर्णय होणार असल्याचे संकेत दिले.

अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महासचिव के. सी. वेणूगोपाल, राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक, प्रदेश काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड उपस्थित होते.

नगर जिल्हाध्यक्ष जयंत वाघ आणि शहराध्यक्ष किरण काळे यांनी अहवाल मांडताना काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतून जोरदार कामगिरी केल्याचे सांगितले. संगमनेर आणि श्रीरामपूर मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार आहे. अकोला, कोपरगाव, राहाता, नगर शहर आणि श्रीगोंदा तालुक्यात पक्षाला चांगले दिसत आलेत. लोकसभेनंतर पक्षाकडे इनकमिंग वाढल्याने पक्षाने संघटन देखील मजबूत केले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत 'अभी नही, तो कभी नही', असे म्हणत या जागांवर दावा कायम ठेवावा, अशी मागणी लावून धरण्यात आली.

गेल्या विधानसभा निवडणुकीत नगर दक्षिणेतून काँग्रेसने एकही जागा लढवली नव्हती. राज्यात महाविकास आघाडी असून, श्रीगोंद्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दावा केला आहे. तसेच नगर शहरात काँग्रेस संघटन मजबूत केले आहे. त्यामुळे नगर शहर विधानसभा मतदारसंघावर दावा असणारच, असे देखील या बैठकीत नगरच्या पदाधिकाऱ्यांनी ठासून सांगितले.

लोकसभेला केलेली मदत काढली

नगर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात काँग्रेसमुळे महाविकास आघाडीला यश मिळाले आहे. नगर दक्षिणेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार निवडून आणण्यात काँग्रेसने महत्त्वाची भूमिका बजावली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात लोकसभा निवडणुकीत किंगमेकरच्या भूमिकेत राहिले. या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने महाविकास आघाडीतील मित्रपक्षांसाठी जीवाचे रान केले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला नगर जिल्ह्यात झुकते माप मिळायलाच पाहिजे, असा आग्रह यावेळी धरण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT