Nashik Politics News :
इन्कमटॅक्सने गुरुवारी नाशिकच्या 14 व्यावसायिकांवर छापे टाकले. या कारवाईत पाच शासकीय कंत्राटदारांचा समावेश आहे. यातील तिघांचा थेट सत्ताधारी मंत्री खासदार आणि आमदारांशी संबंध असल्याने त्यावर उलट सुलट चर्चा सुरू आहे.
lok sabha election 2024 च्या पार्श्वभूमीवर देशभरातील केंद्रीय यंत्रणा पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत. त्यात प्रामुख्याने विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करण्यात येत असल्याची टीका होत आहे. त्यामुळे केंद्रातील महाशक्तीच्या इशाऱ्यावर ही कारवाई होत नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या छाप्यांबाबत विरोधकांच्या मनात गुदगुल्या झाल्यासारखी सुखद भावना नाशिकमध्ये आहे. त्याला कारणही तसेच आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत इच्छुक उमेदवार म्हणून चर्चेत असलेल्या नेत्यांशी जवळीक असलेल्या तीन कंत्राटदारांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. या कंत्राटदारांची सत्ताधारी राजकीय नेत्यांशी एवढी जवळीक आहे की, त्या तपासणीतून कदाचित या नेत्यांनाही झळ बसू शकते. त्यामुळे कारवाई जरी शासकीय कंत्राटदारांवर झालेली असली तरीही सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनाही त्याचा 'शॉक' बसला आहे.
इन्कमटॅक्सने टाकलेल्या छाप्यात नाशिक महापालिकेच्या एका मोठ्या कंत्राटदाराचा समावेश आहे. या कंत्राटदाराने नुकत्याच शिंदे गटाच्या विविध नेत्यांना सरकारकडून मंजूर झालेल्या विविध कामांच्या निधीच्या कंत्राटांचे एकत्रीकरण करून ते स्वतःकडे घेतले होते. यामध्ये मोठा घोळ असल्याची चर्चाही होती. शिंदे गटाचे शहर प्रमुख व अन्य नेत्यांसह शिंदे गटाचा विद्यमान खासदार या कंत्राटदाराचा भागीदार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे इन्कमटॅक्स कशाकशाची चौकशी करणार, त्यातून संबंधित इतरांचीही काही चौकशी होते की काय? या भीतीने शिंदे गटाचे शहरातील नेते अस्वस्थ आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
डांबरीकरण आणि विविध रस्त्यांची कामे करणाऱ्या अन्य एका मोठ्या कंत्राटदाराची देखील इन्कमटॅक्सने काल छापा टाकून चौकशी सुरू केलेली आहे. ही चौकशी अद्याप सुरू आहे. कार्यालय, निवासस्थान आणि अन्य ठिकाणी कागदपत्रांची छाननी केली जात आहे. या कंत्राटदाराचे शिंदे गटाच्या एका मंत्र्यांशी नाव जोडले जाते. राजकीय कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये ते नाव ख्यात आहे. या मंत्र्यांचा मुलगा देखील लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहे. त्याने पक्षाकडे उमेदवारी देखील मागितलेली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इन्कमटॅक्सने ही कारवाई केली आहे. त्यामुळे हा लोकसभेच्या इच्छुक उमेदवारांना महाशक्तीकडून कडक संदेश तर नाही ना? याची चर्चा आहे.
शहरातील पाच कंत्राटदारांवर ही कारवाई करण्यात आलेली आहे. यातील एक कंत्राटदार हा सत्ताधारी भाजप आमदार अशी संबंधित असून त्यांची विशेष सलगी आहे. कारवाई झालेल्या कंत्राटदारांचे थेट सत्ताधारी पक्षाच्या आमदार, खासदार आणि मंत्र्यांशी असे संबंध असल्यानेच इन्कमटॅक्सची नाशिकमधील ही कारवाई विशेष चर्चेचा विषय ठरला आहे.
edited by sachin fulpagare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.