Sugar Stockholding : सणासुदीच्या काळात साखरेची मागणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात साखर वापरणाऱ्या औद्योगिक ग्राहकांना दिलासा दिला आहे. या ग्राहकांना आता त्यांच्या 30 दिवसांच्या गरजेइतकी साखर साठवता येणार आहे. यापूर्वी ही मर्यादा 15 दिवसांची होती.
मात्र, वाढीव साठवणुकीसाठी सरकारने आयातीशी संबंधित अट कायम ठेवली आहे. अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने याबाबत माहिती दिली. दरमहा 10 टनांपेक्षा जास्त साखरेचा वापर उत्पादन, प्रक्रिया किंवा अन्य औद्योगिक कारणांसाठी करणाऱ्या मोठ्या ग्राहकांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.
सरकारने (Government) साखर साठवणुकीची मर्यादा दुप्पट केली असली, तरी खुल्या बाजारातून खरेदी केलेल्या साखरेसाठी पूर्वीची 15 दिवसांची मर्यादा कायम राहणार आहे. 15 दिवसांपेक्षा अधिक साखर साठवायची असल्यास ती टेरिफ रेट कोटा (TRQ) किंवा ॲडव्हान्स ऑथरायझेशन स्कीम (AAS) अंतर्गत आयात केलेली असणे आवश्यक आहे. यामुळे मोठ्या औद्योगिक ग्राहकांना सणासुदीच्या काळातील वाढत्या मागणीसाठी अतिरिक्त साठा करता येईल. मात्र, या सवलतीचा लाभ घेण्यासाठी सरकारने निश्चित केलेल्या आयात मार्गांचे पालन करावे लागणार आहे.
केंद्र सरकारने (Central Government) यापूर्वी TRQ अंतर्गत 10 लाख टन साखर आयातीला परवानगी दिली आहे. तसेच AAS अंतर्गत निर्यातीसाठी राखून ठेवलेल्या साखरेची देशांतर्गत विक्री करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. साखरेच्या साठ्यावर देखरेख ठेवण्यासाठी मोठ्या ग्राहकांना दर शुक्रवारी अन्न मंत्रालयाच्या foodstock.dfpd.gov.in या संकेतस्थळावर साठ्याची माहिती सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
सरकारच्या माहितीनुसार, साखरेच्या कारखाना पातळीवरील किमतीत सुमारे 25 टक्क्यांनी घट झाली आहे. किरकोळ बाजारातील साखरेचा दरही ऑगस्टमधील प्रतिकिलो 65 रुपयांवरून सुमारे 58.50 रुपयांपर्यंत घसरला आहे. मात्र, घाऊक बाजारातील दरातील घसरणीचा पूर्ण लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचलेला नसल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. त्यामुळे घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते आणि व्यापाऱ्यांनी कमी झालेल्या दरांचा लाभ तातडीने ग्राहकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन सरकारने केले आहे.
केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नव्या साखर हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 365 रुपये रास्त व किफायतशीर दर (FRP) मिळणार आहे.
सणासुदीच्या काळात साखरेचा पुरवठा आणि किमतीवर सरकारचे बारकाईने लक्ष राहणार आहे. बाजारातील परिस्थितीनुसार पुढील उपाययोजना केल्या जातील, असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. दरम्यान, औद्योगिक ग्राहकांसाठी साठवणुकीची मर्यादा वाढवण्यात आली असली, तरी खुल्या बाजारातील साखरेच्या साठ्यावर 15 दिवसांची मर्यादा कायम आहे. त्यामुळे या निर्णयाचा औद्योगिक ग्राहक, साखर बाजार आणि सर्वसामान्य ग्राहकांवर नेमका काय परिणाम होतो, याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.