Kanifnath Maharaj Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Controversial religious place : राहुरीच्या गुहा गावातील वादग्रस्त जागेवर कानिफनाथांच्या मूर्तीची स्थापना!

Pradeep Pendhare

Rahuri News : राहुरी तालुक्यातील गुहा गावातील धार्मिक स्थळावरून दोन गटांमध्ये असलेल्या वादाला आता वेगळेच वळण लागले आहे. या धार्मिक स्थळावर एका मंदिरात कानिफनाथांची मूर्तीची गुरुवारी सकाळी प्राणप्रतिष्ठा झाली.

या प्रकारानंतर पुन्हा वादाची ठिणगी पडली. तसेच माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी या धार्मिक स्थळाला भेट दिल्यानंतर, राहुरी पोलिसांनी धार्मिक स्थळाभोवती बंदोबस्तात वाढ केली आहे.

या धार्मिक स्थळावरून दोन समाजात वाद आहे. मध्यंतरी हा वाद चांगलाच उफाळला होता. दोन गट समोरासमोर येत दंगल उसळली होती. दोन्ही बाजूनच्या गटाविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले होते. राज्य पातळीवर नेत्यांनी देखील या वादात उडी घेतली होती. समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी(Abu Azmi) हे गुहा येथे निघाले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना संगमनेरमध्ये रोखले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तर वारकरी आणि नाथभक्तांनी मोर्चा काढत या मारहाणीचा निषेध केला होता. प्रशासनाने ही परिस्थिती संयमाने हाताळली आणि वाद शांत केला. परंतु आता या धार्मिकस्थळी कानिफनाथांची मूर्ती बसवण्यात आली आणि त्यावर आज धार्मिक विधी झाले. यामुळे पुन्हा वादाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

या धार्मिकस्थळी दर गुरूवारी एका समाजाकडून धार्मिक विधी केले जातात. पूजा, आरती केली जाते. आज सकाळी पुजेवेळी या धार्मिकस्थळी कानिफनाथ मूर्ती बसवण्यात आली. ही मूर्ती नेमकी कोणी बसवली याबाबत वेगवेगळ्या अफवांना पेव फुटले आहे. यानंतर ग्रामस्थ आणि भक्तांनी कानिफनाथ मूर्तीची मंत्रोच्चार करत विधीवत पूजा केली. वादात असलेल्या धार्मिकस्थळी अचानकपणे मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाल्याची माहिती पोलिसांना कळल्यावर त्यांची धावपळ उडाली. पोलिसांनी गावामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

यानंतर माजी आमदार शिवाजी कर्डिले(Shivaji Kardile) यांनी धार्मिक स्थळाला भेट दिली. त्यांनी देखील धार्मिकस्थळी नाथभक्तांसह आरतीत सहभागी घेतला.

'गुहा येथे अनेक वर्षांपासून कानिफनाथांची आरती सुरू होती. मध्यंतरी काही लोकांनी अनधिकृतपणे येथे कब्रस्तान आहे, असे भासविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. तो कानिफनाथांना देखील अमान्य असावा. आज मंदिरात कानिफनाथ मूर्ती अवतरल्याचे समजले म्हणून मी पाहण्यासाठी मी आलो', असे माजी आमदार कर्डिले यांनी सांगितले.

याप्रसंगी भाजप जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे, तालुकाध्यक्ष सुरेश बानकर, के. मा. कोळसे, उमेश शेळके यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, पोलीस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपूजे, पोलीस निरीक्षक संजय सोनवणे, प्रांताधिकारी किरण सावंत, नायब तहसीलदार संध्या दळवी यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त गुहा येथे तैनात आहे. याशिवाय अहमदनगर येथील अतिरीक्त पोलीस अधीक्षक विशाल खैरे यांनी याठिकाणी भेट दिली. त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT