Ahmednagar News: पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 ऑक्टोबरला नगर दौऱ्यावर येत असून, शिर्डीत त्यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्यासह विविध कामांचा शुभारंभ होणार आहे. मात्र, आता यावरून दक्षिण नगर जिल्ह्यातील नेत्यांनी मंत्री विखे सर्व कार्यक्रम शिर्डीतच अर्थात उत्तरेतच का घेतात, असा प्रश्न उपस्थित केला असून, या विषयाला राम शिंदे यांनी तोंड फोडले आहे.
पंतप्रधान मोदींच्या नियोजित दौऱ्याबाबत बोलावलेल्या नियोजन बैठकीत पालकमंत्री विखेंच्या समोरच राम शिंदे यांनी या विषयाला हात घालत, दक्षिण नगर जिल्ह्यात मोठ्या नेत्यांचे कार्यक्रम का आयोजित केले जात नाहीत, असा प्रश्न उपस्थित केल्याने दक्षिणेवर उत्तरेतील नेत्यांकडून कसा अन्याय होतो, हा विषय पुढे आणला आहे. राम शिंदेंनी यापूर्वीच जिल्हा विभाजनाच्या मागणीचा आग्रह धरलेला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नगरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 26 ऑक्टोबरला होणारा शेतकरी मेळा भव्यदिव्य आणि यशस्वी करण्यासाठी दक्षिणेतील पदाधिकारी-कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली होती. दक्षिणेतील सातही तालुक्यांतील भाजपचे पदाधिकारी यासह आमदार राम शिंदे, मोनिका राजळे, शिवाजी कर्डिले, विक्रम पाचपुते, जिल्हाध्यक्ष भालसिंग, शहराध्यक्ष अभय आगरकर आदी महत्त्वाचे नेते बैठकीस उपस्थित होते. याव्यतिरिक्त माजी आमदार वैभव पिचड, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंघे आदी नेते उपस्थित होते.
या बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी विशेष करून दक्षिण नगर जिल्ह्यातील नेत्यांना पंतप्रधान मोदी यांचा शेतकरी मेळावा यशस्वी करण्यासाठी विविध सूचना केल्या. केवळ व्हाॅट्सअॅपच्या ग्रुप्सवर सूचना देऊ नका, गावागावांत वैयक्तिक जा, नागरिक, कार्यकर्ते यांना मेळाव्याला मोठ्या संख्येने आणण्यासाठी नियोजन करा, नागरिकांना मेळाव्याला आणण्यासाठी एसटी बस, खासगी बसेसचे नियोजन करा, भाजपचे झेंडे गाड्यांवर लावा आदी सूचना केल्या.
ते म्हणाले, आमदार राम शिंदे यांनी पंतप्रधान, राष्ट्रपती, पक्षाचे अनेक राष्ट्रीय नेते, मंत्री यांचे सर्व कार्यक्रम उत्तर नगर जिल्ह्यात शिर्डीत आयोजित केले जातात, दक्षिणमध्येही कार्यक्रम व्हावेत, अशी आमची मागणी आहे, पण ते होताना दिसत नाही.
नियोजन संपूर्ण जिल्ह्याने करायचे. मात्र, कार्यक्रम उत्तरेतच असे का, असा प्रश्न उपस्थित केला. यावर बोलताना राधाकृष्ण विखे यांनी पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर पंतप्रधान, गृहमंत्री अमित शाह, अशा नेत्यांची तारीख मिळवत सहकार विषयावर मोठा कार्यक्रम दक्षिणेत घेऊ, अशी समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
याबाबत माध्यमांनी बैठकीस उपस्थित असलेले आमदार मोनिका राजळे, माजी आमदार आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांना छेडले असता, उत्तरेप्रमाणे दक्षिणेतही कार्यक्रम झाले पाहिजेत. यासाठी पालकमंत्री विखे यांनी आश्वाशित केल्याचे सांगितले.
या नेत्यांची या विषयावर प्रतिक्रिया सौम्य असली तरी राम शिंदे यांच्या मागणीला त्यांनी पाठिंबा दिल्याचे दिसून आले. मात्र, राम शिंदे यांनी उघडपणे या मागणीद्वारे उत्तरेतील नेत्यांकडून दक्षिणेवर सातत्याने अन्याय होत असल्याचा विषय पुढे आणला. राम शिंदे यांनी यापूर्वी जिल्हा विभाजन झाले पाहिजे, अशी मागणी केली. जिल्हा विभाजनासाठी संग्राम जगताप, नीलेश लंके हे अनुकूल आहेत.
Edited by : Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.