NCP News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar NCP News: नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठे धक्के; शेलारानंतर आणखी दोन शिलेदार 'बीआरएस'च्या संपर्कात?

Ahmednagar Politics: 'बीआरएस'ने आता आपला मोर्चा अहमदनगरकडे वळवला

सरकारनामा ब्यूरो

Ahmednagar News: आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेलंगणातील भारत राष्ट्र समिती अर्थात 'बीआरएस' या पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणात उडी घेतली आहे. यासाठी 'बीआरएस'ने राज्यात मोठी मोर्चे बांधणी करण्यास सुरवात केली असून मराठवाड्यासह सोलापुरातील शेकडो कार्यकर्त्यांनी 'बीआरएस'मध्ये प्रवेश केला. त्यानंतर 'बीआरएस'ने आता आपला मोर्चा अहमदनगरकडे वळवला आहे.

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे बडे तीन नेते 'बीआरएस'च्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्या पैकीच एक असलेले राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार हे 'बीआरएस'च्या संपर्कात असून ते मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. घनशाम शेलार हे चंद्रशेखर राव यांच्या भेटीसाठी हैदराबादमध्ये दाखल झाल्याचीही माहिती आहे. मात्र, या वृत्ताला त्यांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

गेल्या काही दिवसांपासून शेलार राष्ट्रवादीवर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातच माजी आमदार राहुल जगताप यांचे पक्षात वाढणारे वजन त्यांच्यासाठी अडचणीचे ठरणारे आहे. जगताप यांची काही दिवसांपूर्वीच रयतच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी निवड करण्यात आली. तसेच विधानसभेची उमेदवारीही जगतापांना देण्याचे संकेत मिळत असल्यानेच शेलार अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे.

तर दुसरीकडे नगर जिल्ह्यातीलच पाथर्डी आणि कर्जत तालुक्यातील दोन बडे नेतेही 'बीआरएस'च्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. पाथर्डी तालुक्यातील हा नेता आगामी विधानसभेला आपल्याला उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्यामुळे हा नेता 'बीआरएस' पक्षाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.

तसेच कर्जत तालुक्यातीलही एक बडा नेता राष्ट्र्वादीवर नाराज असल्याची चर्चा आहे. पक्षातील स्थानिक पातळीवर आपल्याला विश्वासात घेतले जात नसून स्थानिक पातळीवरील निवडणुकीच्या पराभवाचे खापर आपल्यावरच फोडण्यात येत असल्याने हा नेताही पक्षात नाराज असल्याचं बोललं जात आहे. आपली पक्षातच कोंडी होत असल्याने ते 'बीआरएस'ची चाचपणी करत असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील विविध मतदारसंघातून पक्षाच्या संघटनेची चाचपणी करत उमेदवारांचीही चाचपणी करत आहे. अशातच नगरमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता यापुढे काय-काय राजकीय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Edited By- Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT