Eknath Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon District Bank : आमचाच एक गद्दार झाला; अन्यथा पराभव अशक्य होता : खडसेंनी बोलून दाखवली मनातील खदखद

आमदार मंगेश चव्हाण, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत शेपूट घालून पळाले होते.

सरकारनामा ब्यूरो

जळगाव : आमचाच एक गद्दार झाला, त्यामुळे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत आमचा पराभव झाला. नाही तर बॅंकेच्या निवडणुकीत पराभव होणं शक्यच नव्हतं, अशा शब्दांत माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. (It was not possible for NCP to lose in Jalgaon District Cooperative Bank : Eknath Khadse)

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर संजय पवार यांनी पक्षाचे अधिकृत उमेदवार रवींद्र पाटील यांचा एका मताने पराभव केला. त्यानंतर झालेल्या आरोपाला खडसे हे उत्तर देत होते, त्यावेळी त्यांनी बॅंकेच्या निवडणुकीत झालेल्या गद्दारीबद्दल भाष्य केले.

खडसे म्हणाले की, आमदार मंगेश चव्हाण, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत शेपूट घालून पळाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय पवार या गद्दाराला हाताशी धरून त्यांनी यश मिळविले आणि आम्हाला आता चार गोष्टी शिकवत आहेत. पण यश हे यश असतं आणि अपयश हे अपयश असतं. गद्दारीमुळं जरी त्यांना हे यश मिळालं असलं तरी मी त्यांचं स्वागत करतो.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत एकजण सुद्धा उभा राहायला तयार नव्हता, सगळे शेपूट घालून पळत होते. नाथाभाऊंनी जिल्हा मध्यवर्ती बॅंक ताब्यात आणली आणि या प्रत्येकाला त्या ठिकाणी संधी मिळाली. या निवडणुकीत जी गद्दारी झाली, त्यामुळे तुमचं यश आहे. तुमचं यश निर्भेळ नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

जळगाव जिल्ह्यात नाथाभाऊंनी भारतीय जनता पार्टी मजबूत केली आहे, त्यामुळे मंगेश चव्हाण, गिरीश महाजन यांना स्थान मिळाले. गिरीश महाजन व इतर जे बोलत आहेत, ते अहंकारापोटी बोलत आहेत. या निवडणुकीत सारेच्या सारे आमदार, मंत्री एका बाजूला आणि नाथाभाऊ तसेच राष्ट्रवादीचे आमदार एका बाजूला हेाते. एकटा नाथाभाऊ आजपर्यंत यांना भारी पडतोय. हे सारंच्या सारं सरकार लावतात, पैसा लावत आहेत, माणसं फोडताहेत, तरीही नाथाभाऊ गटनेतेपदापर्यंत पोचलाच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विधानमंडळातील गटनेतेपद मला मिळालेले आहे, ते मी केलेल्या कामाची पावती आहे, असेही खडसे यांनी नमूद केले.

एखाद्या निवडणुकीत गद्दारी करून जिंकणं, हा फार मोठा पुरुषार्थ नाही. समोरासमोर लोकशाही पद्धतीने निवडून येऊन दाखवा. एखाद्याच्या पाठीत खंजीर खुपसणं, गद्दारी करणं याला यश म्हणत नाहीत, असा टोलाही खडसे यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT