Jalgaon BJP Politics : मंत्री गिरीश महाजन यांचे होमग्राउंड असलेल्या जळगाव महापालिकेत सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांमध्ये दोन गट पडल्याचं दिसून येत आहे. जळगाव महापालिकेत भाजपची सत्ता असताना सत्ताधारी पदाधिकारी, नगरसेवकांवर पक्षाच्याच स्थानिक आमदाराने आरोपांची तोफ डागली आहे.
स्थानिक भाजपचे आमदार सुरेश भोळे यांनी पत्रकार परिषद घेऊन काही नगरसेवक कचऱ्याच्या विषयात राजकारण करत असल्याचा आरोप केला होता. आमदार भोळे यांच्या आरोपानंतर जळगाव महापालिकेतील राजकारण ढवळून निघालेलं असताना मंत्री गिरीश महाजन यांनी मात्र आपल्याला या संदर्भात काहीही माहिती नाही, असं सांगत कानावर हात ठेवल्याचे दिसत आहे.
पूर्वी जळगावात कचरा संकलन करणाऱ्या 'वॉटरग्रेस' कंपनीला पुन्हा जळगावात पायघड्या घालण्यासाठीच काही पदाधिकारी आणि नगरसेवक बीव्हीजी कंपनीला ठरवून 'टार्गेट' करत असल्याचा उघड आरोप आमदार सुरेश भोळे यांनी केला आहे. 'वॉटरग्रेस' कंपनीने महापालिकेतील काही नगरसेवकांना चुकीच्या सवयी लावल्या होत्या. व्हीबीजीने महापालिकेत एण्ट्री करताच या चुकीच्या सवयींना चाप लावला. त्यामुळेच काही पदाधिकारी, नगरसेवक बीव्हीजीच्या मागे हात धुवून लागले आहेत. त्यांना व्हीबीजीला अपयशी ठरवून शहरातून हुसकावून लावायचे आहे. पुन्हा मर्जितील 'वॉटरग्रेस' कंपनीला आणायचा डाव असल्याचा आरोप आमदार भोळे यांनी केला आहे.
स्थानिक नेतृत्व बदनाम व्हावं म्हणून काही नगरसेवकांकडून व्हीबीजीला काम करु दिले जात नसल्याचा आरोप आमदार सुरेश भोळे यांनी केला आहे. सत्ताधारी आमदाराने आपल्याच पक्षातील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने जळगाव महापालिकेतील भानगडी चव्हाट्यावर आल्या आहेत. पक्षात दोन गट पडल्याचे दिसत असून हे स्थानिक नेतृत्वाचे अपयश आहे , का असा सवाल मंत्री गिरीश महाजन यांना माध्यम प्रतिनिंधींनी केला. त्यावर मला यासंदर्भात काहीही माहिती नाही असे मंत्री महाजन यांनी सांगितलं. परंतु मी माहिती घेईल. सगळ्या नगरसेवकांची बैठक घेईल असं महाजनांनी स्पष्ट केलं
नाशिकमध्ये कुंभमेळ्याची कामे सुरु असल्याने मी व्यस्त आहे. कुंभमेळा ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. राष्ट्रपतींचा दौरा असल्याने नियोजन सुरु आहे. त्यामुळे मला खरोखर वेळ नाही. जळगावात आमदारांनी काय आरोप केले. तिकडे काय सुरु आहे, माहिती नाही. माहिती घेऊन खुलासा करतो असं महाजन यांनी सांगितलं.
नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या तयारीत व्यस्त असल्याचे सांगत गिरीश महाजन यांनी जळगावातील भाजपमधील अंतर्गत वादाबाबत माहिती नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, आमदार सुरेश भोळे यांनी स्वपक्षातील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांवर केलेल्या आरोपांमुळे जळगाव भाजपमधील मतभेद उघड झाले आहेत. आता महाजन नगरसेवकांची बैठक घेऊन या वादावर काय तोडगा काढतात आणि आमदार भोळे यांनी केलेल्या आरोपांची काय दखल घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.